Saturday, January 4, 2025

/

मनपा करणार अतिरिक्त ४० स्मशानभूमीची देखभाल

 belgaum

तहसील कार्यालयाकडून बेळगाव महानगरपालिकेकडे बेळगाव शहरातील सुमारे ४० स्मशानभूमींचे हस्तांतरण केले जाणार आहे. यासंदर्भात गुरुवारपासून कार्यवाही सुरु करण्यात आली असून मनपाचे महसूल कर्मचारी आणि तलाठी यांनी संबंधित स्मशानभूमीची संयुक्त पाहणी केली.

सदर पाहणीदरम्यान या ४० स्मशानभूमी कोणत्या सर्व्हे क्रमांकामध्ये आहेत, स्मशानभूमीची जागा किती आहे, संबंधित जागेत स्मशानभूमी आहे कि नाही? सदर जागेवर झालेले अतिक्रमण आदींची माहिती तहसीलदार कार्यालयाकडून मनपाला देण्यात आली आहे.

दरम्यान या पाहणीवेळी कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण झाले नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.

मनपा महसूल कर्मचारी आणि तलाठी यांची पाहणी पूर्ण झाल्यानंतर मनपाकडून या स्मशानभूमीचा कबजा घेतला जाणार आहे. महसूल विभागाच्या ताब्यात असलेल्या स्मशानभूमी व तेथील जागेचा कबजा संबंधित नगर स्थानिक स्वराज्य संस्थेकडे दिला जावा, असा आदेश राज्य शासनाकडून बजाविण्यात आला आहे. यानुसार जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी शहरातील महसूल खात्याच्या कब्जात असलेल्या स्मशानभूमी मनपाला हस्तांतरण करण्याचा आदेश तहसीलदारांना बजावला होता. मनपा आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांनी या प्रक्रियेसाठी महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

निवडण्यात आलेल्या ४० स्मशानभूमी या बेळगाव शहरातील उपनगरांमध्ये असून यामध्ये ककती येथील १, कणबर्गी येथील ७, मजगाव येथील ४, खासबाग येथील ७, अनगोळ येथील ५ , वडगाव येथील २, माधवपूर येथील २, यमनापूर येथील १, बेळगाव शहरातील ६, अलारवाड येथील ३ आणि बसवणं कुडची येथील २ स्मशानभूमींचा समावेश आहे.

काही वर्षांपूर्वी जी गावे महानगरपालिका व्याप्तीत समाविष्ट करण्यात आली आहेत, त्या गावांमधील स्मशानभूमीचा प्रामुख्याने यात समावेश आहे. सदाशिवनगर, शहापूर या दोन प्रमुख तसेच अन्य काही स्मशानभूमीची देखभाल देखील मनपाकडे असून आता अतिरिक्त ४० स्मशानभूमीच्या देखभालीचा खर्च वाढणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.