कर्नाटक विकास कार्यक्रमाच्या (केडीपी) प्रगतीची आढावा बैठक आज सोमवारी सुवर्ण विधान सौध येथे जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
सरकारच्या आदेशावरून बिम्स हॉस्पिटलमध्ये 3 डॉक्टरांची बदली करण्यात आली आहे. याखेरीज गरजेनुसार आणखी डॉक्टरांची नियुक्ती केली जाईल असे पालकमंत्र्यांनी बैठकीत सांगितले.
तसेच बीम्स येथे बदली करण्यात आलेल्या डॉक्टरांना त्यांच्या पूर्वीच्या जबाबदारीतून त्वरित मोकळे करावे अशी सूचना त्यांनी उपस्थित आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांना केली. बीम्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे बांधकाम तात्काळ पूर्ण करण्याचा आदेश देण्याबरोबरच त्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन यावी, अशी सूचनाही त्यांनी केली.
विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी कंत्राटदाराला हॉस्पिटलचे काम सत्वर पूर्ण करण्याची सूचना देण्यात यावी असा सल्ला दिला. सदर हॉस्पिटलचे 2019 मध्ये सुरू झालेले बांधकाम पूर्ण होण्यास आधीच मोठा विलंब झाला आहे. तेंव्हा संबंधित विभागाने येत्या हिवाळी अधिवेशनापूर्वी हॉस्पिटलचे बांधकाम पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी असे सांगून जिल्हा पालकमंत्री कारजोळ यांनी या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व्हावे अशी आपली योजना असल्याचे उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले.
यावेळी बोलताना बेळगाव दक्षिणच्या आमदारांनी आपल्या मतदारसंघात ज्या ठिकाणी कीदवाई कॅन्सर हॉस्पिटलची उभारणी करण्याचे निश्चित करण्यात आले आहे त्या जागेत बदल केला जाऊ नये, अशी विनंती केली.