बेळगाव लाईव्ह विशेष : छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या लाखो मावळ्यांच्या साथीने ‘याची देही याची डोळा’ स्वराज्य उभं केलं. ३५० वर्षांचा कालावधी उलटला तरी आजही छत्रपतींचा इतिहास मराठी माणसाच्या तना-मनात जसाच्या तसा आहे. प्रत्येक मराठी माणसाचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपतींचा इतिहास बालचमूंना माहीत व्हावा यासाठी आपल्याकडे रुजू झालेल्या ‘किल्ले संस्कृती’च्या माध्यमातून दसरा-दिवाळीच्या दरम्यान किल्ल्याची प्रतिकृती उभारली जाते. मुलांना किल्ल्यांच्या इतिहासाची माहिती शाळेत पूर्ण मिळत नाही मात्र किल्ला बनविण्याच्या प्रकारीयेतून त्यांना आपल्या समृद्ध संस्कृतीबद्दल आणि वारशाबद्दल खूप काही शिकायला मिळते.
बेळगावमध्येही अनेक ठिकाणी बालचमू, तरुण मित्रमंडळाच्या माध्यमातून किल्ल्यांची आकर्षक प्रतिकृती बनविली जाते. याच औचित्याने भांदूर गल्ली येथील श्री स्वराज मित्रमंडळाने देखील ‘ग्वाल्हेर किल्ल्याची’ भव्य अशी किल्ल्याची प्रतिकृती तयार केली आहे. हुबेहूब आणि आकर्षक वाटणारी किल्ले ग्वाल्हेरची प्रतिकृती मराठी साम्राज्याची आठवण करून देणारी ठरत आहे. भांदूर गल्ली येथील प्रथमेश चौगुले, वरद मेणसे, तेजस मुतकेकर, मंदार मुतकेकर, संकल्प चौगुले, प्रथमेश चं. चौगुले, समर्थ मुतकेकर, अभिषेक , मितेश चौगुले, स्वयम मुतकेकर आदींच्या परिश्रमातून या किल्ल्याची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.
सुमारे १ महिन्याच्या कालावधीनंतर या किल्ल्याची आकर्षक अशी प्रतिकृती साकारण्यात आली असून गुजर महाल , मानसिंग महाल, करण महाल, जहांगीर महाल , हाती दरवाजा, तेली मंदिर , जौहर कुंड, चतुर्भुज मंदिर , सहत्रबहु, दिर, कटोरा तलाव, 80 खांबा विहीर अशा अनेक गोष्टी या किल्ल्याच्या प्रतिकृतीतून साकारण्यात आल्या आहेत.
उत्तर मतदार संघाचे आमदार अनिल बेनके आणि श्रीराम सेना हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांच्याहस्ते या किल्ल्याचे भव्य उद्घाटन करण्यात आले आहे. मराठा संस्थानातील ‘शिंदे’ घराण्याचे स्मरण करून देणाऱ्या ग्वाल्हेर किल्ल्याची प्रतिकृती पाहण्यासाठी असंख्य नागरिकांनी याठिकाणी भेट देऊन किल्ला साकारणाऱ्या कार्यकर्त्यांचे भरभरून कौतुक देखील केले.
मध्यप्रदेशातील गोपांचल पर्वतावर असलेला ‘ग्वाल्हेर किल्ला’ अत्यंत लोकप्रिय आहे. सोबतच हा किल्ला देशातील सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एक आहे. ८व्या शतकात तयार करण्यात आलेला हा किल्ला येथील संस्कृती आणि वैभवाची ओळख आहे. यावर मुघल, तोमर मराठे, ब्रिटिश आणि आता सिंधिया ब्रिटिशांपर्यंत या किल्ल्यावर सर्वांनी राज्य केलं. ‘मराठा’ समाजातील ‘शिंदे’ या वतनदार घराण्यासाठी प्रसिद्ध असलेला ग्वाल्हेर किल्ला बेळगावमधील ग्वाल्हेरच्या प्रतिकृतीमुळे मराठा फौजेने भारतभर कशापद्धतीने आपले साम्राज्य पसरवले याचा इतिहास जागृत करणारा ठरत आहे.
किल्ल्याच्या बांधकामातून मुलांना आपल्या इतिहासाची जाणीव होते. या गोष्टी मुलांना घडवण्यात देखील महत्त्वाची भूमिका बजावतात. इतिहासातील अनेक सुवर्ण क्षण, अनेक मोहिमा, मोहिमेत मिळविलेले यश, पराक्रम, आक्रमण यांचे हे किल्ले साक्षीदार आहे. किल्ला संस्कृतीमुळे आणि इतिहासामुळे मुलांमध्ये सकारात्मकतेचं बीज रोवलं जात आहे हेच यावरून प्रकर्षाने सिद्ध होते.