Wednesday, December 25, 2024

/

बेळगाव विमानतळावर कठीण परिस्थितीची टांगती तलवार

 belgaum

‘उडान’ (उडे देश का आम नागरिक) या महत्त्वाकांशी योजनेची अंमलबजावणी झाली आणि टायर टू -थ्री विमानतळांना जणू नवसंजीवनी प्राप्त झाली ज्याला बेळगाव ही अपवाद नव्हते. उडानच्या तिसऱ्या टप्प्यात अंतर्भाव झालेल्या बेळगाव विमानतळाला उडान अंतर्गत 13 मार्ग मिळाले आहेत.

उडानच्या माध्यमातून विमानाचा हवाई प्रवास सर्वसामान्यांना परवडेल असा करण्याद्वारे व्यावसायिक दृष्ट्या अव्यवहार्य असणाऱ्या मार्गावरील विमान सेवेला प्रोत्साहन देण्याचा प्रयोग यशस्वी झाला. याचे उदाहरण म्हणजे बेळगाव विमानतळाने आपल्या इतिहासातील सर्वाधिक 32 विमान फेऱ्यांचा (16 आगमन व 16 प्रस्थान) अनुभव घेतला.

बेळगाव विमानतळाला मिळालेल्या मार्गावरील विमान प्रवासाचे भाडे स्वस्त असणारी उडान योजना गेले 3 वर्ष सुरू होती. मात्र बेळगावसाठी समाधानचा असणारा हा काळ आता समाप्त होण्याच्या मार्गावर आहे. याचा अर्थ ज्या मार्गावरील विमान सेवेला 3 वर्ष पूर्ण झाली आहेत, त्या विमान कंपन्यांना सरकारकडून आता कोणतेही फायदे मिळणार नाहीत.

हिवाळ्यातील हवाई प्रवासाचे वेळापत्रक नुकतेच 30 ऑक्टोबर रोजी अंमलात आणण्यात आले आहे. त्यानुसार बेळगाव विमानतळावरून दररोज जास्तीत जास्त सरासरी 12 विमान फेऱ्या (6 आगमन व 6 प्रस्थान) सुरू आहेत. एखाद दिवशी ही संख्या वाढून 14 पर्यंत जाते. तथापि उडानची स्वस्त विमान प्रवास भाड्याची योजना समाप्त होताच बहुतांश खाजगी विमान कंपन्या आपापल्या विमान सेवा मागे घेणार आहेत. बेळगाव विमानतळाची प्रवासी संख्याही कमी झाली आहे. त्यामागील मुख्य कारण विमान फेऱ्या कमी होणे हे आहे. स्वस्त विमान प्रवासाच्या उडान योजनेमुळे 2021 -22 सालात बेळगाव विमानतळावरून आगमन व प्रस्थान अशा 6440 विमान फेऱ्या झाल्या. ज्याद्वारे 2 लाख 80 हजार प्रवाशांनी हवाई प्रवास केला.

अलाईन्स एअरने बंद केलेली आपली बेळगाव पुणे विमानसेवा लक्षात घेता विमान सेवा बंद होण्याचे सत्र सुरू झाले आहे. तथापि बेळगावहून उडान अंतर्गत नसलेल्या मुंबई, बेंगलोर आणि हैदराबाद दरम्यानच्या विमान सेवा मात्र यशस्वीपणे सुरू आहेत. अलीकडेच बेळगाव विमानतळ (आयएक्सजी) हे मुंबई, बेंगलोर, अहमदाबाद, हैदराबाद, इंदोर, अजमेर, नागपूर, नासिक, जोधपुर, तिरुपती आणि सुरत या शहरांना जोडण्यात आले आहे. या मार्गांवर स्पाइस जेट, इंडिगो आणि स्टार एअर यांच्या विमान सेवा सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.