सीमाभागातील मराठी भाषा, मराठी संस्कृती टिकून राहावी तसेच मराठी तरुण, तरुणींना योग्य दिशा मिळावी हा उद्देश ठेवून येथील मराठा मंदिर ट्रस्टतर्फे बुधवार दि. 19 रोजी सायंकाळी 5 वाजता प्रसिद्ध व्याख्याते व ग्रामविकासाचे दिशादर्शक प्रदीप लोखंडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आल्याची माहिती मराठा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आप्पासाहेब बी. गुरव व सेक्रेटरी बाळासाहेब काकतकर यांनी दिली.
सदर व्याख्यान विनामूल्य असून सर्व नागरिकांसाठी खुले आहे. या व्याख्यानाला तरुण, तरुणी सह सर्व पालकांनीही उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
ग्रामीण भागासह शहरी भागातील तरुणांना एक नवी दिशा देण्याचे काम प्रदीप लोखंडे करत आहेत. त्यांनी रुलर रिलेशन या नावाची संस्था स्थापन करून आतापर्यंत महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, उत्तरप्रदेश, गुजरात, उत्तराखंड आणि गोवा अशा नऊ राज्यात 49 हजार हून अधिक गावांमध्ये नेटवर्क तयार केले आहे.
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यासारख्या ग्रामीण भागातून पुढे आलेल्या प्रदीप लोखंडे यांचा प्रवास अनेकांना आदर्शवत आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी त्यांची धडपड लक्षवेधी आहे. त्यांनी कॉमर्स मध्ये पदवी संपादन करून मार्केटिंग मध्ये डिप्लोमा शिक्षण घेतले आहे. रुलर रिलेशन या संस्थेच्या माध्यमातून सुमारे 20 हजार शाळांना 28 हजार संगणक मिळवून दिले आहेत.
आतापर्यंत त्यांनी ख्यातनाम मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये व्याख्याने दिली आहेत.
त्यांच्या व्याख्यानामुळे शेकडो तरुण प्रभावित होऊन विविध उद्योगक्षेत्रात स्थिरस्थावर आहेत. ग्रामीण भागातील तरुणांना मार्केटिंग क्षेत्रात टिकाव लागण्यासाठी काय काय प्रयत्न केले पाहिजेत, याची त्यांना चांगली जाण आहे. यामुळे त्यांच्या व्याख्यानाला सीमाभागातील तरुण-तरुणीसह त्यांच्या पालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मराठा मंदिर ट्रस्टतर्फे केले आहे.