हलगा -मच्छे बायपास रस्ता आणि रिंग रोड या प्रकल्पांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न सुरू असतानाच आता बेळगाव -धारवाड रेल्वे मार्गासाठी भूसंपादन करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. यासाठी विविध आमिषे दाखवून शेतकऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.
बेळगाव -धारवाड नव्या रेल्वे मार्गाचा प्रस्ताव आहे. झाडशहापुर, देसुर, नंदीहळ्ळी, गर्लगुंजी, के.के. कोप्प आदी भागातून हा रेल्वे मार्ग जाणार आहे. या रेल्वे मार्गासाठी सुपीक जमीन भूसंपादित केली जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांचा या रेल्वेमार्गाला विरोध आहे.
सुपीक जमिनी ऐवजी खडकाळ, पडीक जमिनीतून हा मार्ग नेण्यात यावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात ही धाव घेतली असून न्यायालयाने या रेल्वे मार्गाच्या कामाला स्थगिती दिली आहे.
या पद्धतीने न्यायालयीन स्थगिती असतानाही गेल्या काही दिवसांपासून पुन्हा भूसंपादनासाठी हालचाली सुरू झाल्या असून नुकसान भरपाई दाखल वाढीव रकमेचे आमिष दाखविले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार भूसंपादनाला असलेला विरोध कमी व्हावा यासाठी रेल्वे खात्याने काही एजंटांना शेतकऱ्यांच्या भेटी घेण्यास पाठवण्यास सुरुवात केली आहे. हलगा -मच्छे बायपासला विरोध झाल्यानंतर ज्या प्रकारे शेतकऱ्यांच्या घरी जाऊन दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला होता, तोच प्रकार आता रेल्वे मार्गासाठी ही सुरू झाला.
त्याद्वारे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र न्यायालयाने कामाला स्थगिती दिली असल्याने शेतकऱ्यांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता तीव्र विरोध करावा, असे आवाहन न्यायालयात धाव घेतलेल्या याचिकाकर्त्या शेतकऱ्यांनी केले आहे.