गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज शनिवारी दुसरे बालपण म्हणून सुपरिचित असलेल्या शांताई वृद्धाश्रमास सदिच्छा भेट देऊन आश्रमाच्या कार्याची प्रशंसा केली.यावेळी आश्रमाच्या वतीने आजी आजोबांच्या वतीने मुख्यमंत्र्यांची आरती ओवाळण्यात आली यावेळी सर्व आजींनी आशीर्वाद दिला
शांताई वृद्धाश्रम येथे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आगमन होताच ॲलन विजय मोरे आणि संतोष ममदापूर यांनी त्यांचे सहर्ष स्वागत केले. यावेळी नगरसेवक रवी साळुंखे यांच्या हस्ते मुख्यमंत्री सावंत यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. आपल्या सदिच्छा भेटीप्रसंगी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शांताई वृद्धाश्रमाची पाहणी करून माहिती जाणून घेतली. शांताई वृद्धाश्रमाचे कार्यकारी अध्यक्ष माजी महापौर विजय मोरे यांनी त्यांना आपल्या आश्रमाच्या कार्याची संपूर्ण माहिती दिली.
यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शांताईत आश्रयास असलेल्या ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला त्यांची मोठ्या आस्थेने विचारपूस केली.
त्याचप्रमाणे माजी महापौर विजय मोरे यांचे उदात्त कारणासाठी सुरू असलेले सामाजिक कार्य तसेच आश्रमातील आदरातिथ्याची मुक्त कंठाने प्रशंसा केली. याप्रसंगी मारिया मोरे, चेर्ली मोरे, वसंत बालिगा, प्रसन्ना घोटगे आदी उपस्थित होते.
शांताईच्या आजीआजोबाच्या सोबत गप्पागोष्टी करून आश्रमचा परिसर पाहून 24 वर्षांपासून चालू असलेला कामाचे कौतुक केले कोणतीही सरकारी मदत न घेता समाजाच्या देणगीतून आश्रम चालवल्या बद्दल संचालक मंडळांचा आणि देणगीदारांचेही कौतुक केलं. पुढील वर्षी आश्रमाच्या 25 वर्षपूर्ती कार्यक्रमाला येण्याचे आमंत्रण देण्यात आले ते स्वीकारत आपण कार्यक्रमाला येण्याचे आश्वासन दिले.