बेळगाव आणि गोव्याचे व्यापार आणि व्यवसायात म्हणजे भाजीपाल्यापासून औद्योगिक क्षेत्रापर्यंत चांगले संबंध आहेत. हे संबंध असेच वृद्धिंगत होऊन दोन्ही राज्यांना त्याचा फायदा होवो, एवढीच माझी सदिच्छा आहे, असे मत गोव्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी म्हटले आहे.
शनिवारी दुपारी शहरातील शनिवारी दक्षिण काशी श्री कमलेश्वर मंदिराला सदिच्छा भेट देऊन देवदर्शन घेण्याबरोबरच तेथील महाराजांचा आशीर्वाद घेतला त्यावेळी ते बोलत होते.
सदर भेटीप्रसंगी प्रारंभी श्री कपलेश्वर देवस्थान मंडळातर्फे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे सहर्ष स्वागत करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री सावंत यांनी श्री कपिलनाथाची पूजाअर्च्या केली. यावेळी देवस्थान समितीतर्फे त्यांचा भगवा फेटा बांधून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी श्री कपिलेश्वर देवस्थान समितीचे सदस्य सुनील बाळेकुंद्री, पी आर ओ अभिजीत चव्हाण, राजू भातकांडे, राकेश कलघटगी आदीसह भाजप नेते किरण जाधव आणि हितचिंतक उपस्थित होते.
श्री कपिलेश्वर मंदिराला भेट दिल्यानंतर माध्यमांनी त्यांना छेडले असता मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, आज मी खास श्री कपिलेश्वर देवस्थानाला भेट देऊन देवदर्शन घेतले आहे. या ठिकाणी देवस्थानाच्या पदाधिकाऱ्यांनी माझे उत्तम स्वागत केले. देवासह येथील महाराजांचे दर्शन घेण्याबरोबरच यज्ञविधीस उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले. भविष्यात पुन्हा या मंदिराला भेट देण्याची संधी लाभो असे सांगून आपल्या बेळगाव भेटीचे कारण त्यांनी स्पष्ट केले.
आज योगायोगाने बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स, शांताई वृद्धाश्रम आणि आता खास करून श्री कपिलेश्वर मंदिराला भेट देण्याची संधी मला मिळाली. बेळगावातील बरेच लोक गोवाशी संबंधित आहेत आणि काहींचा माझ्याशी देखील थेट जवळचा संबंध आहे. गोवा मुक्ती संग्रामापासून आजतागायत गोव्याचे बेळगावशी जिव्हाळ्याचे नाते आहे. बेळगावच्या बऱ्याच जणांनी गोवा मुक्ती संग्रामामध्ये भाग घेतला होता असेही त्यांनी नमूद केलं
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिराला दिली भेट pic.twitter.com/R7BAXUiAak
— Belgaumlive (@belgaumlive) October 15, 2022