रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना उत्पादकता निहाय बोनस (प्रॉडक्टिव्हिटी लिंक्ड बोनस) जाहीर करण्यात आला असून नैऋत्य रेल्वेच्या एकूण 32 हजार 358 रेल्वे कर्मचाऱ्यांना 56.28 कोटी रुपयांचा बोनस मिळणार आहे पात्र रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसाच्या वेतनाच्या आधारावर प्रत्येकी सुमारे 17 हजार 951 रुपये इतका हा बोनस मिळणार आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळांनी 2021 -22 या आर्थिक वर्षासाठी पात्र नॉन गॅझेटेड रेल्वे कर्मचाऱ्यांना आरपीएफ व आरपीएसएफ कर्मचारी वगळता 78 दिवसांच्या वेतनाच्या समतुल्य उत्पादकता निहाय बोनस देण्यास मान्यता दिली आहे. याचा फायदा सुमारे 11.27 लाख नॉन गॅझेटेड रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे. त्यानुसार नैऋत्य रेल्वे अंतर्गत असलेल्या 32,358 रेल्वे कर्मचाऱ्यांना 56.28 कोटी रुपयांचा बोनस दिवाळी सणापूर्वी देण्यात येणार आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांनी प्रवासी आणि मालवाहतूक सेवेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अर्थव्यवस्थेसाठी प्रेरक असे काम त्यांनी केले आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांनी लॉकडाऊनच्या काळातही अन्न, खते, कोळसा आणि इतर वस्तूंसारख्या जीवनावश्यक वस्तूंची अखंडित हालचाल सुनिश्चित केली.
मागील तीन वर्षात रेल्वेने मालवाहतुकीतील बाजारपेठेतील वाटा परत मिळवण्यासाठी आणि योग्य धोरणात्मक उपक्रमांद्वारे प्रवासी भाड्यात वाढ करण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत. परिणामी यंदाच्या वर्षात रेल्वेने पुन्हा गती मिळवली आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांना देण्यात आलेला बोनस हे एक प्रोत्साहन आहे. त्यामुळे उत्पादकता सुधारण्यासाठी आणि रेल्वे ग्राहकांसाठी सुरक्षितता वेग आणि सेवा सुनिश्चित करण्यासाठी कर्मचारी प्रेरित होतील अशी अपेक्षा आहे.