बेळगाव शहरातील गांधीनगर येथे सहा वर्षांपूर्वी घडलेल्या हिंदू -मुस्लिम दंगली प्रकरणातील सर्व 22 संशयीत आरोपींची बेळगाव द्वितीय प्रथमवर्गीय न्यायालयाच्या न्यायाधीशांनी सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे.
रमाकांत कोंडुसकर, प्रकाश वंटमूरकर, पंकज जाधव (सर्व कामत गल्ली), सचिन चव्हाण, सिद्धाप्पा दोडमणी, जगदीश रुदलबंदी, संतोष दोडमणी, राजू चौगुले, निंगणगौडा पाटील, अक्षय दोडमणी, बाळाराम दोडमणी, नितीन कुट्रे, महेश खांडेकर, सुनील हलगेकर, प्रशांत मोदगेकर, सुदर्शन नाईक, मोहन पाटील, कुशल धुडुम, टिंकू दोडमणी, विनोद पद्मन्नावर, प्रशांत डांगे व मनोज ताशिलदार (सर्व रा. जुने गांधीनगर) अशी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेल्यांची नावे आहेत.
या प्रकरणाची माहिती अशी की, गांधीनगर येथे गेल्या 12 जुलै 2015 रोजी दुपारी क्रिकेट खेळणाऱ्या हिंदू मुस्लिम मुलांमध्ये भांडण होऊन त्या दिवशी रात्री 11:50 वाजता हिंदू समाजाच्या 100 ते 150 लोकांनी जाक्रीया गल्ली येथे जाऊन तेथील दुचाकी आणि चार चाकी गाड्यांना आपले लक्ष्य बनवत त्यांची नासधूस केली.
त्यामुळे हिंदू व मुस्लिम समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होऊन दोन्हीकडून तुफान दगडफेक करण्यात आली. या दंगलीमध्ये दोन्ही समाजाचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यानंतर अब्बास अब्दुलमाजीद जमादार (रा. गांधीनगर) यांनी मार्केट पोलीस ठाण्यात उपरोक्त सर्व संशयीतांविरुद्ध फिर्याद दाखल केली होती.
पोलिसांनी संशयीतांवर भा.द.वि. 143, 147, 148, 153, 427 आर /डब्ल्यू 144 कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. या खटल्याची न्यायालयात सुनावणी होऊन न्यायाधीशानी सर्व संशयीत आरोपिंची सबळ पुराव्या अभावी आज सोमवारी निर्दोष मुक्तता केली. आरोपींच्यावतीने ॲड. प्रताप यादव आणि ॲड. हेमराज बेंचन्नावर यांनी काम पाहिले.