रताळी आणि बटाटा काढणीला प्रारंभ झाला असून आता बाजारात रताळ्यांची आणि बटाट्यांची आवक सुरू झाली आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात प्रामुख्याने शेतकऱ्यांमध्ये बटाटा आणि रताळ काढणीची लगबग सुरू झाली असून भाजी मार्केटमध्ये बटाट्याबरोबरच रताळ्याची देखील आवक सुरू झाली आहे. नुकतीच आवक सुरू झाल्याने रताळा आणि बटाटा यांना चांगला भाव मिळाला आहे.
नवरात्र उत्सवाला प्रारंभ होत असून नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांमध्ये रताळ्याची काढणीची लगबग सुरू झाली आहे. यंदा पंधरा दिवस रताळ्याची लागण उशिरा झाल्याने उत्पादन म्हणावे तितके झाले नसून मागणी वाढत असल्याने शेतकऱ्यांमध्ये रताळा काढणीला सुरुवात झाली असल्याचे दिसून येत आहे. बाजारपेठेत आवक कमी असल्याने चांगलाच दर मिळाला असून सध्या दर क्विंटल ला 2200 ते 2500 रुपये आहे.
प्रामुख्याने बेळगाव खानापूर आणि चंदगड तालुक्यातील रताळ्यांना महाराष्ट्र तसेच गुजरात, दिल्ली,पंजाब, हरियाणा या भागात मागणी असते. यामुळे नवरात्र च्या पार्श्वभूमीवर मागील चार दिवसापासून रताळे काढणी सुरू झाली आहे.मागणी अधिक असून त्या तुलनेत बाजारपेठेत उपलब्ध होणारी रताळी कमी असल्याने चांगलाच भाव मिळाला आहे अशी माहिती ए पी एम सी मार्केट मधील रताळी व्यापारी माणिक होनगेकर यांनी बेळगाव live शी बोलताना दिली.
पुढील पंधरा दिवस हा भाव टिकून राहण्याची शक्यता असून इतर पिकांच्या तुलनेत शेतकऱ्यांना चांगला भाव मिळवून देणारे रताळी हे पीक आता विस्तारले असून प्रामुख्याने बेळगाव तालुक्यात देखील ठीक ठिकाणी रताळी लावण्यात आली आहेत यामुळे बाजारपेठेत चंदगड खानापूर तालुक्याबरोबरच बेळगाव तालुक्यातून देखील रताळ्याची आवक होत आहे.
रताळी बरोबरच सध्या बटाटे काढणी देखील सुरू असून सध्याचा बटाट्याचा भाव प्रतनुसार साधारण 2000 ते 2300 तसेच मध्यम आकाराचा बटाटा 1700 ते 1800, तीन नंबरचा बटाटा 1000 ते 1200 आणि गोळी बटाटा 500 ते 600 असा क्विंटलचा दर ठरवण्यात आला आहे.सध्या बाजारात बटाट्याची देखील आवक होत आहे. इंदूर तसेच आग्रा बटाटा देखील बाजारात उपलब्ध होत असल्याने बेळगाव मधील पांढऱ्या बटाट्याला 2200 ते 2500 इतका भाव मिळत आहे.