‘आपली वाहने झाडाखाली पार्क करू नका’, विशेष करून पावसाळ्याला सुरुवात होण्यापूर्वी, पावसाळ्यात आणि परतीच्या पावसावेळी तर ही खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. या पद्धतीची सूचना अलीकडे सातत्याने ऐकावयास मिळत आहे. थंडगार, शितल सावली देणारी आणि परिसराची शोभा वाढवणारी झाडेच आता भीतीदायक आणि धोक्याची वाटू लागली आहेत. का बरं असं घडतंय? शहरातील झाडे खरंच निष्ठुर झाली आहेत का? असा प्रश्न उपस्थित होते आहे. मात्र प्रत्यक्षात हे खरे नाही.
बेळगाव हे कायमच झाडांनी समृद्ध शहर राहिले आहे. उन्हाळ्यात तर झाडाच्या सावलीसारखा दुसरा शितल आसराच नसतो. याची फक्त पादचारीच नव्हे तर आपली चारचाकी वाहने देखील हमी देतात. त्यामुळे मग नेमकं बदललं तरी काय? असा प्रश्न पडतो. पूर्वीच्या काळी आपल्याला वड आणि पिंपळाच्या झाडाचा मोठा आधार वाटायचा. मात्र हीच झाडे कालांतराने इमारती आणि रस्त्यांसाठी अडथळा ठरू लागल्यामुळे त्यांचे उच्चाटन केले गेले. सध्या झाडे शहरातून नामशेष होण्याच्या मार्गावर असून त्यांच्या जागी भारतीय बदाम, पळस, रेन ट्री, गुलमोहर, सिंगापूर चेरी वगैरे प्रचलित झाडे मोठ्या प्रमाणात दिसू लागली आहेत.
खरं तर ही अल्पजीवी ठिसूळ लाकूड असणारी झाडं बिनकामाची आहेत. यात भर म्हणून पायाभूत सुविधांच्या कामांमुळे मुळे कमकुवत झालेली ही झाडे असुरक्षित ठरतात. त्यामुळे मुसळधार पाऊस, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात येऊ शकतो. हे टाळण्यासाठी वृक्षारोपण करताना स्थानिक प्रजातीच्या पूर्वीच्या झाडांना प्राधान्य दिले पाहिजे. त्यामुळे शीतल सावली मिळण्याबरोबरच स्थानिक कीटक आणि पक्षाला आधार मिळू शकेल.
तथापि सध्याच्या घडीला शहरात अस्तित्वात असलेल्या झाडांच्या बाबतीत आपण काय करू शकतो? हा सर्वात गंभीर प्रश्न आहे. याबाबतीत आपण कांही गोष्टी करू शकतो. पहिली गोष्ट ही की त्या झाडांना त्यांच्या मुळांच्या वाढीसाठी पुरेशी जागा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. झाडांचा तोल शाबूत राहून ते कोसळू नये यासाठी वेळच्यावेळी त्यांची छाटणी केली जावी. झाडाच्या आसपास खुदाई अथवा पालापाचोळा जाळण्याचा प्रकार केला जाणार नाही याची दक्षता घेतली जावी. कारण त्यामुळे झाड कमकुवत बनतात. यासारख्या अन्यही कांही गोष्टी आहेत. मात्र सर्वात महत्त्वाचे म्हणजे याबाबतीत लोकशिक्षणाची गरज असून लोकांना त्यांच्या घरांच्या आसपासच्या झाडांची देखभाल करण्यासाठी प्रवृत्त केले गेले पाहिजे. आपण वेळीच योग्य ती पावले उचलली नाही तर झाडांकडे गरज म्हणून पाहण्या ऐवजी धोकादायक म्हणून पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन असाच कायम राहणार आहे. हा दृष्टिकोन बदलण्यासाठीच शहरातील ग्रीन सेव्हीयर्स ही संस्था सतत प्रयत्नशील आहे. या संस्थेकडून वृक्षारोपणाचे उपक्रम सातत्याने राबवण्याबरोबरच दर रविवारी लावलेल्या वृक्षांची देखभालही केली जाते हे विशेष.
आपण जे झाड लावत आहोत ते कठीण लाकडाचे आहे याची प्रथम खातरजमा करून घेतली जावी, जेणेकरून भविष्यात जोरदार वाऱ्यामुळे ती मोडून पडणार नाहीत. जमल्यास कठीण लाकडाच्या परंतु कमी फांद्या असणाऱ्या झाडांचे वृक्षारोपण केल्यास कमी फांद्यांमुळे वीज वाहिन्यांना अडथळाही निर्माण होणार नाही आणि झाडाचा तोलही ढळणार नाही. वृक्षारोपणानंतर वृक्ष वाढीसाठी झाडाच्या सभोवती पुरेशी मोठी जागा मोकळी ठेवावी. त्यामुळे त्या झाडाची मुळे मजबूतपणे जमिनीत रुजतील. अत्यंत कमी वेगाने वाढणारी झाडे ही बळकट आणि दीर्घायुषी असतात हे लक्षात घेतले पाहिजे. तेंव्हा वृक्षारोपण करताना वड, पिंपळ, चिंच वगैरे झाडांना प्राधान्य द्यावे. कारण ही झाडे आपल्या अनेक पिढ्यांना सावली आणि आधार देतील.
Article courtasy:AAB