सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयातील रिक्त जागांमुळे महाविद्यालयांचा दर्जा ढासळताना दिसत आहे. अनेक ठिकाणी प्राध्यापकांच्या जागा रिक्त असून परिणामी विद्यार्थ्यांची पटसंख्या सरकारी महाविद्यालयांमधून कमी असल्याचे चित्र दिसून येते. मात्र सदर रिक्त जागावर आता थेट नेमणूक करण्यात येणार आहे. पदवी पूर्व महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या कमतरतेचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
राज्यातील सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयात रिक्त असणाऱ्या 778 प्राध्यापक पदांवर थेट नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री बीसी नागेश यांनी दिली आहे. राज्यातील अनेक महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांच्या जागा रिक्त असून या पदांवरील नेमणुकी संदर्भात लवकरच अधिसूचना जारी करण्यात येणार आहे.
याकरता पदवी पूर्व विभागाच्या सचिवांना पत्र पाठवण्यात आले आहे.सरकारी पदवी पूर्व महाविद्यालयांमध्ये रिक्त असणाऱ्या जागांवर थेट भरतीद्वारे नेमणुका करण्यास परवानगी मागण्यात आली आहे.
परवानगी मिळाल्यानंतर लवकरच या संदर्भात अधिकृत अधिसूचना जारी केली जाणार असल्याचे शिक्षण मंत्र्यांनी सांगितले आहे. यामुळे जिल्ह्यातील पदवीपूर्व महाविद्यालयातील रिक्त जागांवर देखील प्राध्यापक उपलब्ध होणार आहेत.