केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांची बदनामी करण्यासाठी त्यांच्या नावे सोशल मीडियावर बनावट पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी बेळगाव शहर सीईएन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली असून पोलिसांनी अज्ञाता विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करून घेऊन तपास सुरू केला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आमदार सतीश जारकीहोळी यांच्या नावे समाजातील एका जातीवर समाज माध्यमामध्ये आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली आहे. राम मंदिर आंदोलनात अनेक ओबीसींचा मृत्यू झाला.
मात्र एकाही ब्राह्मणाचा मृत्यू झाला नाही. कारण मंदिराचे ट्रस्टी व पदाधिकारी ब्राह्मण आहेत, एकही ओबीसी नाही -श्री सतीश जारकीहोळी आमदार यमकनमर्डी, अशी पोस्ट अज्ञातांनी व्हायरल केली आहे.
आमदार जारकीहोळी यांना बदनाम करण्यासाठी ही पोस्ट व्हायरल केली असल्यामुळे कसून चौकशी करून कारवाई करावी अशी फिर्याद विजय बसप्पा तळवार (रा. भाग्यनगर, दुसरा क्रॉस) यांनी दिली आहे.
याप्रकरणी गुन्हा नोंद करून घेऊन पोलीस निरीक्षक संजीव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरू आहे.