Friday, December 20, 2024

/

लहानपणापासून शेतीचे बीज रुजवले तर शेतकरी नक्की टिकेल!

 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष : गरिबांचे महाबळेश्वर असे संबोधल्या जाणाऱ्या आपल्या बेळगावमधील बहुतांशी भाग हा शेतजमिनीचा आहे. येथील पिकाऊ जमिनीत पिकणारा बासमती तांदूळ असो किंवा विविध ठिकाणी घेतली जाणारी इतर पिके. येथील निसर्ग हा येथील शेतीमुळे अधिक टिकून आहे. सध्या बेळगावचा विकास करण्यावर सरकारने अधिक भर दिला असून चोहोबाजूंनी विकासाच्या नावाखाली शेतजमिनी बळकाविण्याचा चंग बांधला आहे. अनेक ठिकाणी शेतजमिनीवर बायपास, रिंगरोड यासारखे अनेक प्रकल्पही होऊ घातले आहेत. याला बळजबरीने अनेक शेतकरी आपल्या जमिनी देण्यास भाग पाडले जात आहे. परंतु ज्याठिकाणी अजून शहरीकरणाचा वासही लागला नाही अशाठिकाणी मात्र शेतजमिनीच नाहीशा होत असल्याचे प्रकार दिसून येत आहेत.

तालुक्यातील अनेक शेतजमिनीत अलीकडे मोठमोठी घरे, बंगले बांधले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरीकरणापासून दूर असलेल्या ग्रामीण भागात स्वतःहूनच शहराच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. एकीकडे पिकाऊ जमिनी संपादित करण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांचा सुरु असलेला आटापिटा तर दुसऱ्या ठिकाणी पिकाऊ जमिनीवरच इमले बांधून सुवर्णधन असलेल्या जमिनीची होत असलेली नासधूस हि बाब काहीशी खटकत आहे.

शिक्षणाच्या वाटा आता सर्वदूर पसरल्या आहेत. अनेक विषयांवरील अभ्यासक्रम आता उपलब्ध झाले आहेत. आधुनिकीकरणाच्या या युगात इतर विषयांप्रमाणेच शेती हा विषयदेखील तितकाच महत्वाचा आहे. सध्या कृषी विभागात अनेक आधुनिक तंत्रज्ञान दाखल झाले आहे. मात्र अनेक ठिकाणच्या ग्रामीण भागापर्यंत हे तंत्रज्ञान अद्यापही पोहोचले नाही. यामुळे शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्याबाबत ग्रामीण भागात उदासीनता दिसून येत आहे. शेतात राबण्यासाठी अपार जिद्द आणि मेहनतीची आवश्यकता असते. जुनी पिढी किंवा पारंपरिक, कौटुंबिक शेती करणाऱ्या कुटुंबातील तरुणवर्ग सध्या आधुनिकीकरणाकडे वळत चालल्याचे चित्र दिसून येत आहे. हल्ली अनेकठिकाणी लग्नासाठी स्थळ पाहताना मुलाच्या घरची शेती आहे का याचा विचार करून मुलगी दिली जाते. मात्र शेतजमिनीत तरुणवर्ग कितपत काम करून शेतजमीन पिकवतो याचा मात्र कधीच विचार केला जात नाही. यामुळेच ग्रामीण भागातील तरुण शेतीपासून आणि गावापासून दूर जात आहे. बालपणापासून मिळालेले शेतीसंदर्भात ज्ञान सध्या निरुपयोगी ठरत आहे.Student farming

अलीकडेच एका खाजगी शाळेने शालेय विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात जाऊन शेतीबद्दल महत्व पटवून देत शेतीच्या कामाबद्दल माहिती दिली. कृषी क्षेत्राबद्दल विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता, आनंद आणि आवड निर्माण होणे हि गोष्ट महत्वाची आहेच. परंतु ज्या बेळगावमध्ये बहुतांशी भाग हा शेतजमिनीचा आहे अशा बेळगावमध्ये विद्यार्थ्यांना शेतीकामाबद्दल विशेष ओळख करून देण्याची गरज निर्माण होणे हि दुर्दैवी बाब आहे. बेळगावमधील मराठी शाळेत अनेक शेतकरी कुटुंबातील मुले शिक्षण घेतात. मात्र आपल्याच मुलांना शेतात नेऊन शेतीबद्दल विशेष धडे द्यावे लागत आहेत, याचा विचार पालकांनीही करणे गरजेचे आहे. जी गोष्ट मुलांमध्ये आपसूक यायला हवी त्या गोष्टीचे प्रशिक्षण आपल्याला देण्याची वेळ आली आहे, हि बाब गंभीर आहे.

शेती आणि शेतकरी टिकवण्यासाठी सरकारी यंत्रणांचाही पाठिंबा तितकाच महत्वाचा आहे. कृषी शिक्षण आणि कृषी उद्योगात लहानपणापासून ओढ असेल तरुणपणी नक्कीच शेती करण्याकडे ओघ वाढेल. समाजातील शेतकऱ्याची असलेली गरीब आणि खेडवळ हि प्रतिमा बदलून शेतीविषयक शिक्षण योग्य प्रकारे मुलांसमोर सादर करणे हि काळाची गरज आहे. आपल्या जगण्याचा मूळ आधार असलेल्या शेतीकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिल्यास आपल्याला प्रगतीच्या अनेक वाटा सापडतील हे नक्की.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.