Thursday, April 25, 2024

/

आणीबाणीच्या रस्त्यावर आणीबाणीची वेळ!

 belgaum

बेळगाव : विविध संरक्षण खात्याची कार्यालये असणाऱ्या बेळगावमधील छावणी परिषदेच्या परिसरातील रस्ते सध्या दुरवस्थेची विळख्यात अडकले आहेत. आणिबाणीच्यावेळी लष्करी वाहनांसाठी असणाऱ्या मिलिटरी महादेव ते केंद्रीय विद्यालय क्रमांक २ या भागातील रस्त्यांची चाळण उडाली आहे.

मिलिटरी महादेवपासून शौर्य चौक मार्गे जाणाऱ्या रस्त्यांवर सैन्यदलाची महत्वाची कार्यालये आहेत. मराठा लाईट इन्फन्ट्री, कमांडो ट्रेनिंग सेंटर, चिकू रोप वाटिका, ऑफिसर्स मेस, सीएसडी स्टेशन यासारखी अनेक महत्वपूर्ण कार्यालये या भागात आहेत. छावणी परिषदेच्या हद्दीत येणार हा मार्ग सध्या खड्ड्यांच्या विळख्यात सापडला आहे. दररोज या मार्गावरून हजारो वाहनांची वर्दळ असते. मिलिटरी महादेव पासून शौर्य चौकापर्यंत शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, कामानिमित्ताने जा-ये करणारे नागरिक, अवजड वाहने अशा हजारो लोकांची वर्दळ या मार्गावरून होते.

शिवाय या भागात असलेल्या शर्कत पार्क आणि मिलिटरी महादेव याठिकाणी असलेल्या गार्डनमध्ये अनेक पालक आपल्या मुलांनाही घेऊन येतात. अशावेळी शौर्य चौक मार्गे कॅम्प परिसरात येणारी वाहने आणि कॅम्प परिसरातील मिलिटरी महादेव मार्गे जाणारी अनेक वाहने या मार्गावरून मार्गस्थ होतात.Road cantt area

 belgaum

मात्र याठिकाणी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांची मोठी कुचंबणा होत आहे. शिवाय अपघाताचे प्रसंगही उद्भवत आहेत. हाच मार्ग ग्लोब टॉकीजच्या दिशेनेही जातो. मात्र या सर्व मार्गावर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून या मार्गावरून मार्गस्थ होणाऱ्या वाहनधारकांना जीव मुठीत धरून जाण्याची वेळ आली आहे.

बेळगाव शहरात गेल्या महिन्यात झालेल्या अपघातानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. यानंतर तातडीने आधी दिवसात शहरात अनेक मोहिमा राबविण्यात आल्या. मात्र त्यानंतर पुन्हा बेळगाव प्रशासन आणि रहदारी विभाग निद्रिस्त झाले. दुसरीकडे छावणी परिषदेच्या हद्दीत येणाऱ्या रस्त्यांचा प्रश्न हा दुर्लक्षित राहिला आहे. या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनाच नाही तर वाहनांनाही कसरत करावी लागत आहे.

आणीबाणीच्या काळात सैन्यदलाच्या वाहनांसाठी सुरक्षित असलेल्या मार्गावर आणीबाणीची वेळ आली आहे. या भागातील रस्त्यांची अशा पद्धतीने उडालेली चाळण सुरक्षित ठरेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत येणाऱ्या या रस्त्याची दुरुस्ती तातडीने करण्याची आवश्यकता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.