भक्तीभावाने नुकत्याच शांततेत पार पडलेल्या बेळगावातील श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकी दरम्यान नियमांचे उल्लंघन करून साऊंड सिस्टिम लावल्याप्रकरणी खडेबाजार, कॅम्प आणि शहापूर पोलीस ठाण्यात एकूण 6 सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
उपरोक्त तीन पोलीस स्थानकांव्यतिरिक्त मार्केट, टिळकवाडी आणि एपीएमसी पोलिसांनी देखील आता साऊंड सिस्टिम वापरलेल्या मंडळांविरुद्ध गुन्हे दाखल करून घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
विसर्जन मिरवणुकीप्रसंगी पोलिसांनी एकीकडे साऊंड सिस्टिम लावण्यासाठी मुकसंमती दर्शवली. मात्र त्यानंतर आता थेट गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केल्याने गणेश भक्तातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. बेळगावच्या गणेशोत्सवाला मोठी परंपरा आहे पुणे व मुंबईच्या धर्तीवर बेळगावात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो.
यंदा कोरोनाचे कोणतेच निर्बंध नसल्यामुळे सर्वसामान्य गणेश भक्तांपासून सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांपर्यंत सर्वांनी मोठ्या उत्साहात भक्तीभावाने हा उत्सव साजरा केला. कांही किरकोळ घटना वगळता सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करत श्री विसर्जन मिरवणूक देखील शांततेत पार पाडली.
सर्व गणेशोत्सव मंडळांनी नियमांचे पालन करत दोन टॉप व दोन बेस लावावेत, असे लोकप्रतिनिधींनी स्पष्ट केले होते. त्याचबरोबर राज्यातील मंत्री आणि पोलिस अधिकाऱ्यांबरोबरही याबाबत चर्चा करण्यात आली असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे बहुतांश सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांनी साऊंड सिस्टिम लावली होती. विसर्जन मिरवणुकी दिवशी पोलिसांनी प्रारंभी आक्षेप घेतला असला तरी नंतर साऊंड सिस्टिमला मुकसंमती दिली होती.
मात्र आता ज्या मंडळांनी साऊंड सिस्टिम वापरली होती त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन, वेळेची मर्यादा न पाळणे वगैरे नियमांवर बोट ठेवत खडेबाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन, कॅम्प येथील दोन तर शहापूर पोलिसांच्या व्याप्तीतील एका सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.