डॉक्टरांनी ब्रेन डेड म्हणून घोषित केलेल्या एका व्यक्तीचे हृदय धारवाड येथील एसडीएम हॉस्पिटलमधून झिरो ट्रॅफिकच्या माध्यमातून आज पहाटे बेळगाव केएलई हॉस्पिटलमध्ये सुखरूप आणण्यात आले. तसेच त्याचे यशस्वी प्रत्यारोपणही करण्यात आले.
एसडीएम हॉस्पिटल धारवाडहून जिवंत हृदय घेऊन आज शुक्रवारी पहाटे 4 वाजता निघालेली हार्ट ॲम्बुलन्स अवघ्या तासभरात म्हणजे पहाटे 5 वाजता बेळगावातील केएलई हॉस्पिटलमध्ये पोहोचली.
कोप्पळ जिल्ह्यातील कुनीकेरी तांडा येथील गिरीश सोमप्पा कुरी या 39 वर्षीय युवकाचा नुकताच धारवाडमध्ये दुचाकी चालवत असताना अपघात झाला. सदर अपघातात गंभीर जखमी झालेला गिरीश सर्वतोपरी प्रयत्न करूनही उपचाराला प्रतिसाद देत नव्हता. तपासणीत त्याचा मेंदू मृत झाल्याचे निदर्शनास आल्याने डॉक्टरांनी गिरीशला ब्रेन डेड घोषित केले. अपघातात मेंदू निष्क्रिय झाल्याने गिरीश कोमात गेला होता.
डॉक्टरांनी गिरीशच्या कुटुंबीयांशी त्याच्या अवयवादानाबाबत चर्चा करून समुपदेशन केल्यानंतर कुटुंबीयांनी अवयव दानास सहमती दिली. गिरीश एका खाजगी कंपनीत फिटर म्हणून काम करत होता.
त्याच्या पश्चात पत्नी व तीन मुले असा परिवार आहे. केएलई हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराने त्रस्त असलेल्या एका व्यक्तीवर गिरीशच्या हृदयाचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले आहे. या पद्धतीने एकंदर आपल्या मृत्यूनंतरही गिरीशने एकाला जीवदान दिले ही अनुकरणीय आणि समाधानाची बाब आहे.गेल्या काही महिन्यात दुसऱ्यांंदा धारवाड हुन बेळगावला झिरो ट्रॅफिकमध्ये हृदय आणून यशस्वीपणे प्रत्ययारोपण करण्यात आले आहे.