बेळगाव शहर परिसरात अनेक मार्गांवर अंधाराचे साम्राज्य पसरले असून अनेक ठिकाणी पथदिपा अभावी नागरिकांची कुचंबणा होत आहे. मात्र पथदीपाअभावी अनेक रस्ते अंधारात असताना मनपाचा अजब कारभार पुन्हा एकदा निदर्शनात आला आहे.
नेहमीची वर्दळ असणाऱ्या आणि शहराचे मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या धर्मवीर संभाजी चौकातील विद्युत फोकस दिवसाढवळ्या सुरूच असल्याने यामुळे मनपाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. पथदीप तर दिवसाही सुरु असल्याने प्रशासनाला दिवसाही अंधारच दिसतो आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत ठिकठिकाणी बसवण्यात आलेले पथदीप, बंद अवस्थेतील डेकोरेटिव्ह पोल आणि त्यांची निगा राखण्यात महानगरपालिका कमी पडत असून सायंकाळच्या वेळी पथदीप तसेच विद्युत फोकस लावणे आणि पहाटेच्या वेळी ते बंद करणे महत्वाचे आहे. मात्र याबाबाबत देखील दुर्लक्ष होत असल्याचे धर्मवीर संभाजी चौकातील प्रकारावरून दिसून येत आहे.
शनिवारी दुपारी बारा वाजता देखील धर्मवीर संभाजी चौकातील फोकस सुरूच होता. पथदिपा अभावी नागरिकांची गैरसोय होत आहे सातत्याने पाठपुरावा करून देखील ते बसवण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मात्र आठवड्यातून एकदा अथवा दोन वेळा शहरात ठिकठिकाणी बसवण्यात आलेले पथदीप सुरूच असल्याचा प्रकार नागरिकांच्या निदर्शनास येतो. हि बाब प्रशासनाच्या निदर्शनात येत नसून दिवसाढवळ्या सुरू असणारा फोकस नागरिकांचे चांगलेच लक्ष वेधून घेत असल्याचे दिसून आले.
या प्रकारावरून नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे विद्युत पुरवठ्या अभावी ग्रामीण भागात भारनियमन वाढविण्यात येत आहे तर दुसरीकडे शहरात मात्र अशा प्रकारे वीज वाया जात असून याची गांभीर्याने दखल घेऊन वीज वाया जाऊ नये याकडे कटाक्षाने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.