खडेबाजार, शीतल हॉटेल जवळील थळ देवस्थान (मुख्य देवस्थान) या सुमारे 90 वर्षे पुरातन मंदिराच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा टाकून अस्वच्छता निर्माण केली जात आहे. यासाठी या ठिकाणी कचरा टाकण्यावर तात्काळ कायमस्वरूपी बंदी घालावी आणि सदर मंदिराचे पावित्र्य जपावे, अशी मागणी परिसरातील नागरिक व भाविकांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे.
खडेबाजार, शीतल हॉटेल जवळील थळ देवस्थान (मुख्य देवस्थान) हे सुमारे 90 वर्षे पुरातन मंदिर आहे. या देवस्थान परिसरात सतत मोठ्या प्रमाणात घाण व केरकचरा टाकण्यात येत असल्याने खूप दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे देवस्थानाचे पवित्र धोक्यात आले आहे. तसेच डास, माशा, उंदीर, घुशी, गोगलगाई, किडे यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. उंदीर व घुशींमुळे देवस्थानाची नासधूस होत आहे. त्यामुळे पूजाअर्चा धार्मिक विधि करणे, देवळास प्रदक्षिणा घालणे कठीण झाले आहे.
यासंदर्भात स्थानिक स्वच्छता पर्यवेक्षक व मनपा आरोग्य अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार करून देखील तेथील कचऱ्याची समस्या निकालात काढण्यासाठी कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. आता दसरा व दिवाळी सण जवळ आला आहे.
या सणानिमित्त भक्तजन देवस्थानांत येतात. त्यावेळेस अस्वच्छ दुर्गंधीयुक्त वातावरणात पूजा विधी का करावा? हा प्रश्न आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर योग्य कारवाई करून सदर मंदिराच्या ठिकाणी कचरा टाकणे कायमस्वरूपी बंद करावे अशी आमची कळकळीची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदन सादर करतेवेळी प्रवीण कनेरी, दीपक खटावकर, अजित कोकणे, विकास कलघटगी, हेमंत हावळ, महेश खटावकर, नितीन चिकोर्डे, मनोज पतंगे, सुरेश पिसे, अमर कोपर्डे , निरंजन बोगांळे, सुनील कनेरी, अशोक रेळेकर, प्रमोद काकडे आदी उपस्थित होते.