देशातील विविध छोट्या शहरांना हवाई मार्गाने जोडण्याची सरकारची योजना असून त्याचाच एक भाग म्हणून अथणी (जि. बेळगाव) तालुक्यात मिनी विमानतळ बांधण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.
अथणी येथे मिनी विमानतळ उभारण्याच्या अनुषंगाने बेंगळूरच्या एका पथकाने अलीकडेच अथणी तालुक्याला भेट दिली असून सरकारी खुल्या जागेची पाहणी केली आहे. महाराष्ट्र -कर्नाटक राज्याच्या सीमेवरील अथणी तालुका हा पूर्वी कागवाड तालुक्याचा भाग होता.
अलीकडे कागवाड स्वतंत्र तालुका म्हणून उदयास आल्यामुळे अथणी तालुक्याच्या विकासाला अधिक गती देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून बेळगाव शहरापासून सुमारे 150 किमी अंतरावरील अथणीमध्ये आता नव्या विमानतळाची निर्मिती करण्याचा प्रस्ताव आहे.
कर्नाटक राज्य औद्योगिक व पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या पथकाकडून गेल्या ऑगस्ट अखेर अथणीत विमानतळासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे. मिनी विमानतळासाठी धावपट्टी, टर्मिनल व इतर पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी 150 एकर जमिनीची आवश्यकता आहे. यलाडगी येथे तितकी जमीन उपलब्ध असून ती विमानतळासाठी योग्य असल्यास आणि तांत्रिक विभागाकडून हिरवा कंदील मिळाल्यास येत्या कांही दिवसात अथणीत नवीन विमानतळ उभारण्याच्या कामाची सुरुवात होऊ शकते.
उपलब्ध माहितीनुसार अथणी येथे 20 आसनी छोट्या विमानांसाठी विमानतळ बांधण्यात येणार असून ते एक प्रकारे मिनी विमानतळ असणार आहे. आमदार महेश कुमठळ्ळी यांनी यासंदर्भातील प्रस्ताव कर्नाटक राज्य औद्योगिक आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळाला दिला आहे.