बेळगाव लाईव्ह विशेष /बेळगावच्या संस्कृतीतील सण-उत्सवांची परंपरा हि प्रसिद्ध आहे. शिवजयंती असो, गणेशोत्सव असो किंवा नवरात्रोत्सवातील सीमोल्लंघन असो… बेळगावच्या संस्कृतीचे एक विशिष्ट असे वैशिष्ट्य आहे. मात्र अलीकडे बेळगावमधील अनेक उत्सवांच्या परंपरांचे रूप पालटत आहे. पारंपरिक सण साजरे करण्याऐवजी अलीकडे परप्रांतीयांचे अनुकरण होत असल्याचे निदर्शनात येत आहे. गेल्या दोन वर्षातील कोविड परिस्थितीमुळे अनेक सण-उत्सवांच्या जल्लोषावर मर्यादा आल्या. मात्र मागील वर्षीपासून पुन्हा धुमधडाक्यात सण-उत्सव साजरे होऊ लागले आहेत. याचाच एक भाग म्हणजे नवरात्रोत्सव!
बेळगावमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून पारंपरिक नवरात्रोत्सव आणि दसरा साजरा केला जातोय. हजारो देवस्थानांमधून आकर्षक रोषणाई, सजावट, आरास केली जाते. एकेकाळी केवळ गुजराथी आणि मारवाडी समाजाकडून गरबा-रास-दांडिया खेळून नवरात्रोत्सव साजरा केला जायचा. गुजराथ भवन, मिलेनियम गार्डन यासारख्या क्वचित ठिकाणीशुल्क आकारून पासेस वर मोठ्या प्रमाणात दांडिया कार्यक्रमाचे आयोजन केले जायचे. मात्र अलीकडे बेळगावमध्ये हे चित्र पालटले असून शहर-तालुक्यातील प्रत्येक गल्लोगल्ली दांडियाचे आयोजन करण्यात येत आहे. मध्यमवर्गीयांना रास गरबा खेळणे परवडत नव्हते मात्र सगळीकडे दांडियाचे आयोजन होत असल्याने सगळ्याना हे शक्य होत आहे.
दांडिया आणि गरबा हे प्रकार केवळ गुजराथी, मारवाडी समाजामध्ये सुरु असायचे. रात्रभर देवीच्या समोर जागे राहण्याच्या दृष्टीने नवरात्रोत्सव रास गरबा साजरा करण्याची हि या समाजांची परंपरा आहे. आज शहरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात दांडियांचे आयोजन करण्यात येत आहे. दिवसागणिक या कार्यक्रमाला तरुणाईची गर्दीही वाढत चालली आहे.
दुसरीकडे आदिशक्ती रूपातील विविध स्वरूपातील देवींची प्रतिष्ठापना करण्यात येत आहे. ज्याप्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो त्याप्रमाणे आता बेळगावमध्ये नवरात्रोत्सवात आदिशक्तीच्या सार्वजनिक मूर्ती प्रतिष्ठापना होत आहेत. हि संस्कृती मूळची बंगालची आहे. मात्र हळूहळू मूर्ती प्रतिष्ठापना हा गल्लोगल्ली असणाऱ्या युवक – महिला मंडळांचा नवा ट्रेंड होऊ लागला आहे. नवरात्रोत्सवात दुर्गाष्टमीच्या निमित्ताने दुर्गा, काली अशा विविध स्वरूपातील मूर्तिपूजा या बंगाल, गुजराथच्या परंपरा आहेत. हळूहळू बेळगावमध्ये देखील हि परंपरा रुजत चालली आहे. ज्याप्रमाणे गणेशोत्सवात आगमन आणि विसर्जन सोहळा पार पडतो त्याच धर्तीवर आदिशक्तीचा आगमन सोहळा आणि विसर्जन सोहळाही धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. बेळगावमध्ये सर्वप्रथम कांगली गल्ली येथील एकता युवक मंडळातर्फे हि परंपरा सुरु करण्यात आली होती. मात्र आता बेळगावमधील बहुतांशी मंडळे विविध स्वरूपातील देवी मूर्तींची प्रतिष्ठापना करून मोठ्या जल्लोषात नवरात्रोत्सव साजरा करताना दिसत आहेत.
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या विद्यानिकेतन शाळेच्या मैदानावर पार पडणारा सीमोल्लंघनाचा कार्यक्रम, अनेक सासन काठ्यांचा आणि १८ प्रमुख गल्ल्यांच्या पालखीचा सोहळा, त्यानंतर कॅम्प येथील कुंतीमाता रथोत्सव हे बेळगावचे नवरात्रोत्सवाचे स्वरूप होते. मात्र अलीकडे बेळगावच्या अनेक उत्सवांचे स्वरूप बदलले असून इतर रूढी परंपरा वाढल्याचेही दिसून येत आहे. सण, उत्सव म्हटलं कि झगमगाट, रोषणाई, सजावट आलीच. सण उत्सवात या गोष्टी महत्वाच्या आहेतच. मात्र कर्कश्श गाणी, डीजे यावर भान हरपून थिरकणारी तरुणाई असे प्रकार कुठेतरी थांबविण्याची गरज आहे. उत्सव साजरा करण्यातून आनंद, समाधान मिळायलाच हवे मात्र यापासून इतरांना त्रास होणार नाही हाही विचार करणे आवश्यक आहे.
एकंदरीत सर्वच सण – उत्सव साजरे करत असताना सामाजिक भान राखून प्रत्येकाने काळजीने, जबाबदारीने वागणे महत्वाचे आहे. सण साजरे होताना आपल्या संस्कृतीला शोभेल असेच सण साजरे करायला हवेत. कोणतेही अनुचित प्रकार घडणार नाहीत याचीही काळजी घेणे आवश्यक आहे. शिवाय उत्सव आणि सण साजरे करताना ते ‘विधायक’ दृष्टिकोनातून साजरे होणे हे त्याहूनही महत्वाचे आहे.