Saturday, September 7, 2024

/

नागरिकहो.. थोडे तरी भान बाळगा!

 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष : ‘सोशल मीडिया’ हे प्रत्येकाच्या हातचे बाहुले बनले आहे. अनेक नेटकरी हे बहुधा ‘वॉट्सअप युनिव्हर्सिटी’मधून विशेष प्राविण्य मिळविलेले असतात. त्यामुळे आपल्याला जे वाटेल, जसे वाटेल, तशा पद्धतीच्या पोस्ट्स ते चुटकीसरशी, कोणताही विचार न करता फॉरवर्ड करत असतात. या पोस्ट अशा पद्धतीने वायरल होतात कि त्यामुळे कधी विनोद घडतात तर कधी प्रकरणे अंगाशी येतात, कधी कुणाच्या जीवापर्यंत या गोष्टी येतात तर कधी कुणाचे नाहक नुकसान करणाऱ्या ठरतात.

सध्या बेळगावमध्ये अशा अनेक घटनांवरून असे प्रत्यय येत आहेत. बेळगावमध्ये गेल्या २ आठवड्यांपासून तळ ठोकून असलेला बिबट्या हा सध्याच्या बेळगावकर सोशल मीडिया/नेटकऱ्यांचा चवीने चघळण्याचा विषय बनला आहे. यावरून अनेक मिम्स, पोस्ट्स, फोटोज वायरल केले जात असून यामुळे नाहक अफवा पसरल्या जात आहेत.

गेल्या १५ दिवसांपासून बेळगाव रेस कोर्स, गोल्फ कोर्स मैदान, जंगल परिसरात बिबट्या तळ ठोकून आहे, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. बिबट्याचा या परिसरातील वावर कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हिंडलगा परिसरातील नागरिक आणि वनविभागाच्या निदर्शनास बिबट्या आला असून बिबट्याला अडकविण्यासाठी या भागात ७ ठिकाणी सापळे रचण्यात आले आहेत. २२ ठिकाणी ‘ट्रॅप कॅमेरा’ बसविण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासन, वनविभाग, पोलीस विभाग युद्धपातळीवर बिबट्या शोध मोहीम राबवित आहेत.Leapord mohim

या परिसरात भीतीचे वातावरण असून सावधानतेचा इशारा वेळोवेळी देण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनातर्फे सातत्याने गस्त घालण्यात येत आहे. या भागातून मार्गस्थ होणाऱ्यांसाठी सावधानतेचा सूचना देण्यात येत आहेत. रात्रीच्या वेळी एकट्याने फिरू नये, शालेय विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण करताना खबरदारी घ्यावी, काळजी घावी असे आवाहन करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत जनता असून सध्या बिबट्यावरील खोटे व्हिडीओ, मेसेज आणि फोटोज बेळगावमध्ये वेगाने वायरल होत आहेत. सोशल मीडियावर बिबट्या संदर्भातील पोस्ट्स वेगवेगळ्या पद्धतीने वायरल होत असून जनतेसह प्रसारमाध्यमेही यासाठी जबाबदार ठरत आहेत.

False viral image
False viral image belgaum social media

बेळगाव वगळता इतर अनेक ठिकाणचे फोटो एडिट करून वायरल होत आहेत. यामुळे चुकीची माहिती आणि अफवा पसरत असून भयावह परिस्थितीत आणखी वाढ होत चालली आहे. यामुळे डिजिटल असो किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रत्येक प्रसारमाध्यमांनी ‘फॅक्ट चेक’ किंवा बातमीमागील तथ्य, सत्यासत्यता पडताळून पाहावी आणि नंतरच कोणतीही बातमी प्रकाशित करावी. शिवाय नागरिकांनीही अशा गोष्टी रोखण्यासाठी पुढाकार घेणे अत्यावश्यक आहे.False image viral

सध्या ज्या परिसरात बिबट्या तळ ठोकून आहे त्या परिसरात सुमारे २२ शाळा आहेत. हजारो विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेण्यासाठी येतात. या शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बिबट्याचा वावर धोकादायक आहे. सलग ८ दिवस सुट्टी दिल्यानंतर पुन्हा शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र अद्याप बिबट्याचा शोध लागला नाही आणि धास्तीही कायम आहे. आधीच २ वर्षे कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. याचबरोबर अतिवृष्टी आणि बेळगावमधील अनेक घटनांमुळे शाळांना सुट्टी दिली जाते.

या साऱ्या गोंधळात विद्यार्थ्यांचे मात्र अतोनात शैक्षणिक नुकसान होत आहे. यामुळे नागरिकांनी अशा पद्धतीच्या पोस्ट वायरल करण्यापूर्वी, फॅक्ट चेक करण्याआधी फॉरवर्ड करण्यापूर्वी हजारवेळा विचार करावा, केवळ मौज म्हणून पोस्ट्स वायरल किंवा फॉरवर्ड करू नये ही सारी खबरदारी घेऊन नागरिकांनी भान पाळणे गरजेचे आहे.

बेळगावमध्ये आधीच अनेक घटना घडत आहेत. सामाजिक स्वास्थ्य राखण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. अशा घटना रोखून बेळगावमध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन व्यस्त आहे. सध्या सोशल मीडियावर वायरल होत असलेल्या पोस्टमुळे प्रशासनावरील दबाव वाढत चालला आहे. जंगल, वन्यप्राणी आणि मानव यांच्यातील संघर्ष आधीच वाढत चालला आहे. अशावेळी प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य ओळखून समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी आणि कर्तव्य योग्य पद्धतीने, सुजाण नागरिक बनून पार पाडणे ही काळाची गरज आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.