belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष : स्वच्छतेबाबत नागरिक जागरूक नाहीत हा आरोप सपशेल चुकीचा आहे. नागरिकांना स्वच्छता हवी आहे. मात्र ती केवळ आपल्या घरापुरती मर्यादित! वाक्य वाचून डोक्यात काही प्रकाश पडला का वाचकांच्या?

हो… बरोबर आहे आम्हा नागरिकांना स्वच्छता हवी आहे पण ती आपल्या घरात… परिसर स्वच्छतेचे धडे केवळ शाळेत, पर्यावरण दिनी, इतर काही कार्यक्रमात आणि हल्लीच्या फोटो सेशन पुरते मर्यादित! अगदी एखाद्या चित्रपटात प्रसंग दाखवावा तसे आपण काही काळ जागे होतो परंतु घर गाठलं कि पुन्हा ये रे माझ्या मागल्या… परिसर स्वच्छतेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ‘स्वच्छ भारत अभियान’ सुरु केले. घरोघरी कचरा उचल करण्यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांची नेमणूक केली.. नागरिकांना त्रास नको म्हणून कचरा उचल करणाऱ्या वाहनांचीही सोय केली. अगदी सकाळी सकाळी ‘गाडी वाला आया देखो कचरा निकाल…’ अशा धून मध्ये गाणीही ऐकविली.. गाणं इतकं श्रवणीय चालीचं होत कि आपसूक कित्येकांच्या तोंडी हे गाणं दिवसभर गुणगुणलं जायचं.. इतकं सारं असूनही नागरिकांच्या डोक्यात प्रकाश का पडत नाही? याचे उत्तर मात्र अनुत्तरित आहे.

नेहमी प्रशासनाच्या नावे ‘ठो’ ठोकणाऱ्या नागरिकांना आपल्या जबाबदारीची जाणीव कधी होणार आहे? याबाबत देखील अंतर्मुख होणे गरजेचे आहे. नेहमीच प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर आपण टीका करतो. मात्र आपल्या बेजबाबदार पणाबाबत आपण कधी विचार करणार आहोत का?

आज हा विषय मांडण्याचा उद्देश हा आहे.. कि बेळगावमधील कचऱ्याची उचल न होण्याच्या तक्रारी आपण ऐकतो मात्र ज्याठिकाणी प्रशासनाने कचऱ्यासाठी सोय केली आहे तिथे नागरिक कचरा व्यवस्थापनात कमी पडत आहेत हे एका दृश्यावरून आपण पाहू शकतो. शहरापासून ३ ते ४ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या हिंडलगा कार्यक्षेत्रातील रामघाट रोड- गणेशपूर मार्गावर दोन ठिकाणी नागरिकांनी कचरा फेकून परिसर स्वच्छतेचे धिंडवडे उडविले.Garbage

वारंवार या भागाची स्वच्छता करण्यात आली. मात्र नागरिकांना आपल्या चुकीच्या वागणुकीची जाणीव किंचितही झाली नाही. शेवटी हिंडलगा ग्रामपंचायतीने नामी शक्कल लढविली आणि या कचरा फेकण्यात आलेल्या भागात स्वच्छता करून नामफलक लावले, बसण्यासाठी आकर्षक अशी आसनव्यवस्थाही केली. स्वातंत्र्यवीर सावरकरांची माहिती देणारा नामफलकही लावला. ‘तुम्ही सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आहात.. येथे कचरा टाकू नये…’ असाही नामफलक लावला आणि कचरा टाकणाऱ्यास ५००० रुपये दंड घेण्यात येईल असा इशारा देणारा फलकही लावला. परंतु या साऱ्यानंतरही आपली सद्सद्विवेकबुद्धी गहाण टाकलेल्या नागरिकांनी पुन्हा कचरा या परिसरात उगवलेल्या झाडाझुडुपांत टाकलाच! या वागण्याला नेमके कोणते नाव द्यावे? हे हि आता नागरिकांनीच ठरवावे.

भारत महासत्ता होण्याच्या दिशेने स्वप्न पहात आहे. इतर देशांप्रमाणे सुधारण्याच्या वाटेवर आपण आहोत असा आभास होत आहे. मात्र पाश्चात्य देशात स्वच्छतेबाबत असलेली नागरिकांची जागरूकता, आपण राखलेल्या स्वच्छतेमुळे इतरांना उपद्व्याप होणार नाही, इतरांना नुकसान होणार नाही याची घेण्यात येणारी दक्षता, आणि या साऱ्या कर्तव्यदक्षपणामुळे तेथील नागरिकांची सुधारलेली जीवनशैली! यात शिक्षणाचाही घटक म्हत्वाचाच आहे. तेथील नागरिकांची शैक्षणिक क्षमताही उच्च आहे.. यानुसार तेथील लोकांचे जीवनमानही उंचावले आहे…या साऱ्या गोष्टी भारतातील अक्कल गहाण ठेवलेल्या नागरिकांना कधी सुबुद्धी देतील हाही एक मोठा प्रश्न आहे.Garbage

हल्ली अनेक विषयांवर आधारित बॉलिवूडमध्ये चित्रपट निघाले. निरर्थक विषयांवर तर असंख्य चित्रपट तयार होतात. परंतु आजतागायत स्वच्छतेसंदर्भात समाज प्रबोधन करणारा ना एखादा चित्रपट आला आणि नाही यासंदर्भात बॉलिवूडशी निगडित मंडळींनी सौजन्य दाखविले. हल्लीची तरुणाई बॉलिवूडप्रधान झाली आहे! चित्रपटातील आधारित नको त्या गोष्टींचे अनुकरण करण्यात तरुणाई सुपरफास्ट झाली आहे. सोशल मीडिया तर आज प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. मात्र समाजासाठी हे तरुण कधी ‘सोशिअल’ होणार हा गंभीर आणि तितकाच महत्वाचा प्रश्न आहे.

त्यामुळे नागरिकहो… अनुकरण करण्यात तर आपण सारेच माहीर आहोत… कर्तव्यदक्ष आहोत.. प्रशासनाच्या एका चुकीवर शंभर बोटे उगारण्यातही आपण तत्पर आहोत… परंतु आपली जबाबदारी आपण कधी ओळखणार? आणि आपली जबाबदारी ओळखून आपण ‘सुजाण नागरिक’ कधी होणार? असे असंख्य प्रश्न आपण स्वतःलाच विचारण्याची आज नितांत गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.