जनावरांना लम्पि स्किन डिसिस या त्वचा रोगाची लागण होत असून याचा झपाट्याने फैलाव होत आहे. याला अटकाव घालण्यासाठी सदर रोगग्रस्त जनावरांना घराबाहेर काढू नये, असे आवाहन पशुसंवर्धन खात्याने केले आहे.
जिल्ह्यात लम्पि स्किन डिसिसची (त्वचा रोग) आतापर्यंत 10 लाखाहून अधिक जनावरांना लागण झाली असून त्यापैकी एक लाखाहून अधिक जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पशुपालन करणाऱ्या हजारो शेतकऱ्यांवर संकट आले आहे. यासाठी शासनाच्या विमा योजनेचा उपयोग करून अशा रोगराईमुळे उद्भवणाऱ्या आर्थिक संकटातून मुक्त व्हा. तुमच्या जनावरांचा आजच विमा करा, आर्थिक नुकसानीतून पार व्हा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
बसवणं कुडची येथे दोन बैल दगावल्याच्या पाश्वभूमीवर पशु संगोपन खात्याच्या वतीनं ही जनजागृती करण्यात आली आहे.डास, माशी, गोचडी आदीच्या चाव्यामुळे लम्पि स्किन रोगाचा प्रसार होत आहे. यासाठी जनावरांना चरण्यासाठी, विक्री करिता बाजारात नेण्यासाठी तसेच शर्यतीसाठी घराबाहेर काढू नये. ज्या जनावरांला या रोगाची लागण झाली आहे त्याला वेगळ्या ठिकाणी बांधण्याची सोय करावी.
त्या जनावरावर माश्या, डास बसू नयेत यासाठी शक्यतो मच्छरदाणी अथवा इतर उपाय करावेत, असे मार्गदर्शन पशुसंवर्धन खात्याच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.
लम्पि स्किन रोग औषधोपचाराने बरा होणार आहे. जनावराला ताप, डोळ्यातून पाणी येणे ही या रोगाची प्राथमिक लक्षण आहेत. त्यानंतर जनावरांनाच्या त्वचेवर चट्टे आणि फोड येतात. ही लक्षण आढळल्यास घाबरून न जाता तात्काळ पशुवैद्यकीय डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे आवाहन पशु संगोपन खात्यातर्फे करण्यात आले आहे.