बेळगाव परिसरात बिबट्याची दहशत असल्याने रेस कोर्स परिसरात बिबट्याची शोध मोहीम सुरू आहे. बिबट्या या परिसरात दाखल होऊन आठवड्याभराचा कालावधी उलटला आहे.तरी देखील वनविभागाला बिबट्याला जेरबंद करण्यात अपयश आले आहे.
परिणामी वनखाते या परीक्षेत सपशेल फेल झाले आहे.घर की मुर्गी दाल बराबर असे म्हटले जाते म्हणूनच की काय कर्नाटक राज्य वनमंत्री बेळगाव जिल्ह्याचेच असून देखील बिबट्याला शोधण्यात दिरंगाई केली जात आहे.
राज्याचे वनमंत्री उमेश कत्ती हे बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील आहेत. मात्र बिबट्याच्या शोध मोहिमेसाठी वनमंत्र्यांकडून कोणत्याही प्रकारची पावले अथवा भाष्य करण्यात आलेले नाही. घटनेचे गांभीर्य विचारात घेऊन वनमंत्री उमेश कत्ती यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सदर विषय हाताळणे गरजेचे आहे मात्र बिबट्या शोध मोहिमेचे इतके प्रकरण गाजत असताना देखील वनमंत्र्यांनी कोणत्याही प्रकारचे भाष्य केले नसून आता वनमंत्री कोठे आहेत असा सवाल सर्वसामान्य नागरिकांमधून विचारला जात आहे.
जाधव नगर परिसरात बिबटया दाखल झाल्यानंतर पुढे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून रेस कोर्स परिसर आणि सदर परिसरात असणाऱ्या 22 शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. परिणामी या परिसरात निर्भीडपणे फिरणे देखील कठीण झाले असून केवळ दोन दिवसावर येऊन ठेपलेल्या स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव साजरा करताना सदर शाळेचे विद्यार्थी शाळेत उपस्थित राहू शकतील का असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.
बिबट्या नंतर शुक्रवारी भूतरामहट्टी गावांत हा प्राणी आला होता… pic.twitter.com/TT3wlPkznb
— Belgaumlive (@belgaumlive) August 12, 2022
वनखात्याकडून बिबट्याला पकडण्यासाठी 12 ट्रॅप कॅमेरे, 7 पिंजरे तसेच ड्रोन कॅमेरे लावण्यात आलेआहेत. शिवाय पन्नास वनाधिकाऱ्यांची टीम देखील त्या ठिकाणी दररोज कार्यरत आहे मात्र अजूनही बिबट्या वनविभागाच्या हाती सापडला नसून या प्रकारामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. घनदाट जंगल असलेल्या भागात कशा पद्धतीने अशा हिंस्र प्राण्यांना पकडले जाते याबाबत विचार करून ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त होत असून या प्रकारामुळे वनखात्याच्या कार्यभारावर ताशेरे ओढले जात आहेत.
खानापूर तसेच म्हैसूर बंडीपुर या भागात घनदाट जंगल तसेच अभयारण्य असून सदर भागातील जंगली प्राण्यांना कशा पद्धतीने हाताळले जाते याबाबत विशेष वनविभागाची टीम बोलावून तातडीने बिबट्याचा शोध घेऊन जेरबंद करावे म्हणजे नागरिकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून फायदेशीर ठरेल.
बिबट्याची दहशत असल्याने सर्वसामान्य नागरिक घाबरले असून प्रशासनाने ठोस पावले उचलून याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज देखील व्यक्त होत आहे.