समाजात वावरताना अनेकांना विविध प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. काहींना आपल्या स्वतःच्या जीवनाचा गाडा ओढण्यासाठी अनेक कष्ट सोसावे लागतात. तर काही लोक स्वाभिमानाने शून्यातून विश्व निर्माण करतात. संपूर्ण आयुष्य चंदनाप्रमाणे झिजवून इतरांना सुगंध देतात. आणि आपल्या आयुष्यानंतरदेखील आपला ठसा कायमस्वरूपी उमटवून जातात.
बेळगावमधील शट्टूप्पा सुबराव बेनके हेही त्यापैकीच एक! आमदार अनिल बेनके यांचे वडील शट्टूप्पा सुबराव पाटील यांचे २५ जुलै २०२२ रोजी वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या ९० वर्षांच्या कारकिर्दीचा त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘बेळगाव लाईव्ह’ ने घेतलेला आढावा…
मूळचे चंदगड तालुक्यातील माणगाव येथील शट्टूप्पा सुबराव बेनके. स्वाभिमानी, चोख व्यवहार, मृदभाषी, संयमी, शांत आणि शिस्तीचे पालन करणारे अशी त्यांची ओळख होती. आई वडील आणि भावंडांसह बेळगावमध्ये स्थायिक होण्यासाठी माणगावहून आलेले बेनके कुटुंबीय बेळगावमध्ये स्थिरावले. प्रतिकूल परिस्थितीला मात देण्यासाठी अनेक प्रयत्नांची पराकाष्ठा या कुटुंबाला करावी लागली.
शट्टूप्पा बेनके यांच्या विवाहानंतर त्यांनाही प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढावा लागला. सहा अपत्यांचा सांभाळ अत्यंत नीटनेटकेपणाने करत उत्तम संस्कार आणि शिक्षण दिले.
सातवी पर्यंतचे शिक्षण घेतलेले शट्टूप्पा बेनके हे सुरुवातीला कार्पोरेशन बँकेत शिपाई म्हणून सेवा बजावत होते. ७ रुपये पगारात आपला प्रवास सुरु ठेवणाऱ्या शट्टूप्पा बेनके यांना एवढ्याच पैशात सहा अपत्ये, पत्नी आणि संसार सांभाळावा लागायचा. अशाही परिस्थितीत त्यांनी स्वतःच्या भावांना तसेच वडिलांना मदत केली. रामलिंग खिंड गल्ली येथून छोट्याशा घरातून संसाराची सुरुवात करणाऱ्या शट्टूप्पा बेनके यांनी माळमारुती एक्स्टेंशन येथे जागा घेऊन एक छोटे घर बांधले.
तुटपुंज्या कमाईत घरखर्च परवडत नसल्याने पिग्मी कलेक्शनदेखील त्यांनी सुरु केले. यादरम्यान त्यांना त्यांच्या पत्नीचे मोलाचे सहकार्य मिळाले. मुलांची शिक्षणे करता करता शट्टूप्पा बेनके यांनी दहावीची परीक्षा दिली. आणि यानंतर त्यांची बढती क्लार्क पदी झाली. मुलांचे विवाह, सुना, नातवंडे पणतवंडे परिवाराचा मोठा डोलारा, सांभाळत वयाच्या ७० व्या वर्षीपर्यंत त्यांनी सायकलीवरून प्रवास केला. कोविड कालावधीपर्यंत स्वतःच्या घराचा कार्यभार त्यांनी स्वतःच सांभाळला.
भाजीपाल्यासहीत सर्व बाबतीत स्वतः जातीने लक्ष देत कुटुंबाचा डोलारा त्यांनी लीलया पेलला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, कडक शिस्तीखाली मोठी झालेली पाचही अपत्ये आज मोठमोठ्या पदावर कार्यरत आहेत. रामचंद्र, महादेव, संजय, अनिल, बाळकृष्ण, सुनीता अशी विविध नामांकित कंपन्यांमध्ये कार्यरत असणारी सहा अपत्ये, बेळगावच्या राजकारणात प्रसिद्धी मिळविलेले आमदार अनिल बेनके या साऱ्या मुलांच्या यशाच्या श्रेयात त्यांचा मोलाचा सहभाग आहे.
१९३२ ते २०२२ अशा ९० वर्षांच्या प्रवासात अनेक खाचखळग्यांनी भरलेले आयुष्य जगत आपल्या कुटुंबाला तितक्याच ताकदीने जोडून ठेवत प्रत्येकाच्या मनात त्यांच्या निधनानंतरदेखील त्यांनी आपला ठसा कायम ठेवला आहे. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!