बेळगाव डीसी ऑफिस अर्थात जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील रस्त्यांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. सदर रस्ते सिमेंट काँक्रीटचे (सीसी) बनविण्यात येणार असून त्याचे कंत्राट देण्यासाठी बेळगाव शहर विकास प्राधिकरणाच्या आयुक्तांनी निविदा जारी केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील रस्ते सिमेंट काँक्रीटचे बनविण्यासाठी खर्चाचा अंदाज 97.83 लाख रुपये इतका गृहीत धरण्यात आला असून आदेश मिळाल्याच्या तारखेपासून 6 महिन्याच्या आत काम पूर्ण करावयाचे आहे. जिल्हाधिकारी कार्यालय आवारात बरीच खुली जागा असली तरी तिचा वापर करण्यात आलेला नाही. आता संपूर्ण आवार परिसर अतिक्रमण मुक्त करण्यात आला असून येथील खुल्या जागांचा सदुपयोग करण्याच्या दृष्टीने योजना आखण्यात आली आहे.
सदर योजना आखण्यापूर्वी अलीकडेच जिल्हाधिकारी नितेश पाटील आणि डीसीपी रवींद्र गडादी यांनी संपूर्ण आवाराचे सर्वेक्षण केले होते. सिमेंट काँक्रीटचे रस्ते हा त्या योजनेचाच एक भाग असून योजनेतील अन्य बाबींचा तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही.
जिल्हाधिकारी कार्यालय आवारात एकाधिक आंदोलन -निदर्शनांसाठी समर्पित जागाही निर्माण केली जाणार आहे. त्यामुळे चन्नम्मा सर्कल येथे निदर्शने व आंदोलनामुळे बऱ्याच वेळा होणारी वाहतूक कोंडीची समस्या निकालात निघणार आहे.