शहरात गेल्या कित्येक वर्षापासून हॉटेल सन्मानसमोर असलेला पशुवैद्यकीय दवाखाना स्थलांतरित करण्यात आला असून हा दवाखाना आता महांतेशनगर येथे कार्यरत होणार आहे. मात्र या कृतीला तीव्र विरोध होत असून सदर दवाखाना जेथे आहे तेथेच राहावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
हॉटेल सन्मानसमोर सरदार्स मैदानानजीक महापालिकेच्या जागेत गेल्या कित्येक वर्षापासून सुरू असलेल्या दवाखान्याचे स्थलांतर करण्यात आले आहे. शहराच्या मध्यवर्तीय भागातील गोंधळी गल्ली, कोनवाळ गल्ली आणि कॅम्प परिसरातील गुरे पाळणाऱ्या गवळी समाजासाठी हॉटेल सन्मान समोरील पशुवैद्यकीय दवाखाना सोयीचा होता. आता हा दवाखाना महांतेशनगर येथे हलविण्यात आल्यामुळे शहरातील गवळी समाज बांधवांसाठी ते अंतर दूरचे होणार असून त्यांची मोठी गैरसोय होणार आहे.
सरदार्स मैदाना नजीकचा महापालिकेच्या जागेतील दवाखाना फार पूर्वीपासून सुरू असल्यामुळे या परिसरात संबंधित पशु औषधांची दुकाने आहेत. त्यामुळे महांतेशनगर येथे दवाखाना सुरू झाल्यास औषधासाठी गवळी बांधवांना हेलपाटा घालावा लागणार आहे. सदर दवाखान्याच्या स्थलांतरामुळे फक्त गवळी बांधवांचीच नव्हे तर शहरातील कुत्री मांजर पाळणाऱ्या पशुप्रेमींची देखील गैरसोय होणार आहे. आपल्या प्राण्यांवर उपचार करण्यासाठी त्यांना महांतेशनगरपर्यंत धावाधाव करावी लागणार आहे. एकंदर महांतेशनगर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यामुळे शहरातील संबंधित सर्वांनाच मनस्ताप होणार आहे.
ही झाली पशुपालकांची व्यथा दुसरीकडे सन्मान हॉटेल समोरील दवाखान्यामुळे तेथील ऑटोरिक्षा चालक, पशुखाद्य विक्रेते आदी लोकांचे पोट चालत होते. मात्र हे अर्थांजन आता हा दवाखाना महांतेशनगर येथे स्थलांतरित झाल्यामुळे बंद होणार आहे. सन्मान हॉटेल समोरील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या परिसरात पशु प्राण्यांशी संबंधित 8 ते 7 दुकानांसह चार पशु औषधाची दुकाने आहेत. दवाखान्याच्या स्थलांतरामुळे या सर्वांवर संकट कोसळणार आहे. या सर्व परिस्थितीची जाणीव असून देखील आमदारांसारख्या लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.
शहरातील पशुपालकांच्या सोयीसाठी जुन्या दवाखान्याच्या ठिकाणी किमान प्राथमिक उपचाराच्या सुविधा उपलब्ध ठेवावयास हव्या होत्या. मात्र तसे न करता संपूर्ण दवाखान्याचे महांतेशनगर येथे स्थलांतर करण्यात आले आहे. यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून दवाखान्याच्या स्थलांतरास विरोध केला जात आहे. तेंव्हा म्हशी पळविण्याच्या शर्यतीसाठी पुढाकार घेणाऱ्या आणि गवळी समाजाचा आधार असणाऱ्या बेळगाव उत्तरच्या आमदारांनी याप्रकरणी गांभीर्याने लक्ष घालावे. तसेच हॉटेल सन्मान समोरील पूर्वापार पशुवैद्यकीय दवाखाना आहे त्या ठिकाणीच ठेवावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.