केपीटीसीएल कनिष्ठ दर्जा सहाय्यक पदासाठी घेतलेल्या परीक्षेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असून ब्लूटूथ डिव्हाईसचा उपयोग केल्याप्रकरणी परीक्षार्थी पर्यवेक्षक आणि उपप्राचार्यासह 9 जणांना अटक करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी ही माहिती दिली.
पोलीस मुख्यालयात काल सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये जिल्हा पोलीस प्रमुख डॉ संजीव पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाच्या वतीने गेल्या 7 ऑगस्ट रोजी केपीटीसीएल कनिष्ठ दर्जा सहाय्यक पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. त्यावेळी गोकाक परीक्षा केंद्रातील एका परीक्षार्थीने स्मार्टवॉचचा उपयोग करून प्रश्नपत्रिकाचा फोटो टेलिग्राम ॲपच्या माध्यमातून आपल्या मित्राला पाठवून बेकायदेशीर रित्या परीक्षा दिली असल्याची फिर्याद चिक्कोडी पदवी पूर्व शिक्षण खात्यातील द्वितीय दर्जा सहाय्यकाने गोकाक शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
प्राथमिक तपासात गोकाक शहर पोलिसांनी पहिल्या मुख्य संशयित परीक्षार्थी सिद्धाप्पा मदलीहाळ याला अटक करून चौकशी केली असता त्याच्याकडून धक्कादायक माहिती समोर येऊन संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. पोलीस चौकशीत सिद्धाप्पा याने केपीटीसीएल परीक्षा दरम्यान ब्लूटूथ डिव्हाईसचा उपयोग केल्याची कबुली दिली आहे.
सदर प्रकरणाचे धागेदोरे गदगपर्यंत पोहोचले असून पोलिसांनी एकूण 9 जणांना अटक केली आहे. पोलीस तपासात गदग येथील नगरपालिकेच्या पदवी पूर्व कॉलेजमधून प्रश्नपत्रिका फुटल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे त्या कॉलेजचे उपप्राचार्य व प्राचार्याच्या मुलाला सुपरवायझरसह अटक करण्यात आली आहे. जिल्हा सीईएन विभागाचे पोलीस निरीक्षक वीरेश दोडमणी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.