दोन दिवसांपूर्वी फोर्ट रोड येथे रस्ते अपघातात एका विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्यानंतर कॅम्प येथील फिश मार्केटनजीक आज सकाळी ट्रक खाली सापडून अरहान बेपारी हा विद्यार्थी ठार झाल्यामुळे शहरातील धोकादायक अवजड वाहतुकीची समस्या ऐरणीवर आला आहे. तसेच ही वाहतूक तात्काळ बंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
बेळगाव शहरात गेल्या कांही वर्षांपूर्वी रात्री 8 ते पहाटे 6 वाजेपर्यंत अवजड वाहनांना प्रवेश बंदी होती. मात्र कालांतराने हा नियम इतिहास जमा होऊन शहरातील अवजड वाहनांची वाहतूक पुन्हा सुरू झाली. गेल्या काही दिवसात अवजड वाहनांची ही वाहतूक धोकादायक ठरू लागली आहे. गेल्या दोनच दिवसाच्या कलावधीत ट्रक सारख्या अवजड वाहनाखाली चिडून दोन विद्यार्थ्यांचा बळी गेलेला आहे. त्यामुळे शहरातील अवजड वाहनांची वाहतूक किमान दिवसभरासाठी बंद ठेवण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. शहरातील रस्ते अपघातातील विद्यार्थ्यांच्या दुर्दैवी मृत्यूची गांभीर्याने दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने शहरातील अवजड वाहनांची वाहतूक तात्काळ बंद करावी अशी मागणी होत आहे.
लोखंड भरलेल्या ट्रक खाली सापडून आज सकाळी कॅम्प येथे ठार झालेला अरहान बेपारी हा इस्लामिया हायस्कूलचा विद्यार्थी होता. तो आपल्या बहिणीसह स्कुटीवरून जात होता. त्यावेळी खानापूरकडून बेळगावकडे येणाऱ्या लोखंड भरलेल्या चालकाचे नियंत्रण सुटलेल्या मालवाहू ट्रकने त्यांना धडक दिली आणि त्या ट्रकखाली चिरडून अरहान जागीच ठार झाला. ट्रकने फक्त स्कुटीलाच नाही तर एका कारला देखील ठोकल्यामुळे त्या दोन्ही वाहनांचे नुकसान झाले.
एकंदर शहरातील अवजड वाहनांची वाहतूक ही शहरवासीयांसाठी विशेष करून शाळकरी मुलांसाठी मृत्यूचा सापळा बनली आहे असे म्हंटल्यास वावगे ठरू नये. जीवित हानी होण्याबरोबरच अवजड वाहनांमुळे वाहनांचे आणि मालमत्तेचेही नुकसान होत आहे.
संचयनी सर्कल ते ग्लोब सिनेमागृहा पर्यंत अत्यंत अरुंद रस्ता आहे आणि नेमकं याच भागात अनेक शाळांची संख्या आहे त्यामुळे या भागात नेहमी गर्दी असते वाहनांचा ट्रॅफिक जाम होत असतो आणि छोटे मोठे अपघात नेहमी घडत असतात अश्यावेळी हा रस्ता दोन्ही बाजूने 40-40 फूट रुंद करण्याची गरज असताना मास्टर प्लॅन झालेले नाही त्यामुळे देखील या रस्त्यावर अधिक अपघात होत आहेत ही समस्या देखील सोडवण्याची मागणी होत आहे.
शहरात दिवसभर सुरू असलेली अवजड वाहनांची वाहतूक सकाळच्या वेळी शाळा भरण्याच्या आणि सायंकाळी शाळा सुटण्याच्या वेळी अधिक धोकादायक ठरत आहे. या कालावधीत शाळकरी मुलांची रस्त्यावर मोठी ये -जा असते हे ध्यानात घेऊन किमान दिवसभर शहरांमध्ये अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालावी, अशी शहरवासीयांची मागणी आहे.
बुधवारी सकाळी कॅम्प भागांत नियंत्रण सुटलेल्या ट्रकने शाळकरी विद्यार्थ्याला चिरडले ही घटना सी सी टी व्ही त कैद झाली आहे. pic.twitter.com/iw1YZe6foA
— Belgaumlive (@belgaumlive) August 3, 2022