बेळगाव गोल्फ कोर्स मैदान परिसरात दडी मारून बसलेल्या बिबट्याला पकडण्यात अद्याप यश आलेले नाही. श्री गणेश चतुर्थी निमित्त आज मंगळवारी शोध मोहीम( कोंबिंग ऑपरेशन)तूर्तास स्थगित करण्यात आली असली तरी गोल्फ मैदान परिसरात बंदोबस्तासाठी जवळपास 60 पोलीस व वन कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
शहरातील गोल्फ कोर्स मैदान परिसरात गेल्या 27 दिवसांपासून ठाण मांडून असलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी मोठ्या मनुष्यबळासह प्रशिक्षित श्वान पथक, ड्रोन कॅमेरे प्रशिक्षित हत्ती, आधुनिक तंत्रज्ञान, हनीट्रॅप आदींचा अवलंब करून देखील त्यातून काहीच निष्पन्न झालेले नाही. बिबट्या अजूनही शहरानजीकच्या जंगल परिसरात मोकाट वावरत आहे. या जंगल परिसरात मुबलक भक्ष आणि पाणीसाठा असल्यामुळेच बिबट्याने त्या ठिकाणी मुक्काम ठोकला असावा असा कयास व्यक्त केला जात आहे.
वनखाते पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. यासाठी बिबट्या पहिल्यांदा आढळल्याच्या दिवसापासून गेले 27 दिवस सातत्याने शोध मोहीम राबविली जात आहे.
रेंज फॉरेस्ट ऑफिसर राकेश अर्जुनवाड यांनी बिबट्याला शोधण्यासाठी प्रशिक्षित पथकाच्या माध्यमातून शोध मोहीम सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे इतर तांत्रिक गोष्टींचा वापर केला जात असल्यामुळे बिबट्या लवकर सापडेल असा विश्वासही व्यक्त केला आहे. दरम्यान श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज श्री गणेश चतुर्थी दिवशी बिबट्याची शोध मोहीम तूर्तास थांबविण्यात आली आहे.
त्यामुळे शोध मोहिमेत सहभागी अधिकारी, कर्मचारी, हत्ती, श्वानपथक वगैरे सर्वांनाच थोडी विश्रांती मिळाली आहे. शोध मोहीम थांबविण्यात आली असती तरी गोल्फ कोर्स मैदान परिसरात खबरदारीचा उपाय म्हणून जवळपास 60 पोलीस व वनकर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.