गणपती बाप्पा मोरयाच्या गजरामध्ये फटाक्यांच्या आतषबाजीत अत्यंत उत्साही मंगलमय वातावरणात ढोलताशाच्या साथीने आज बुधवारी गणेश चतुर्थी दिवशी बेळगाव शहर आणि परिसरात भक्तीभावाने घरोघरी तसेच सार्वजनिक मंडपामध्ये श्रीमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली.
कोरोनाच्या संकटानंतर तब्बल दोन वर्षांनी पूर्वीप्रमाणे मुक्त वातावरणात श्री गणेशोत्सव साजरा करण्यास मिळणार असल्यामुळे आज गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी अनंत चतुर्दशीला शहर परिसरातील गणेश भक्त बाप्पाच्या स्वागतासाठी आतुर झाले होते. पंचांगाप्रमाणे गणरायाच्या प्रतिष्ठापनेसाठी पहाटेपासून शुभ मुहूर्त असल्यामुळे भल्या सकाळी घरगुती श्रीमूर्ती आणण्याची लगबग दिसून आली. शहरातील मूर्तिकारांच्या ठिकाणी परंपरेनुसार श्रीमूर्ती नेण्यासाठी आलेल्या भाविकांची गर्दी झाली होती.
नागरिक हातातून, डोक्यावरून तसेच ऑटोरिक्षा, कार आदी वाहनांमधून फटाक्याच्या आतषबाजीत श्री गणेश मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी घरी घेऊन जाताना दिसत होते. कांही उत्साही भाविकांनी गणरायाच्या स्वागतासाठी ढोलताशे पथकालाही पाचारण केले होते. त्यामुळे आज पहाटेपासून शहर उपनगरातील बहुतांश मार्गावर फटाक्याच्या आतषबाजीत वाजत गाजत घरगुती श्री गणेश मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी नेण्यात येत असल्याचे पहावयास मिळत होते.
कोरोनाच्या दोन वर्षानंतर श्री गणेशोत्सव साजरा करण्यात येत असल्यामुळे विशेष करून मंडळाच्या कार्यकर्ते आणि तरुणाईची लगबग वाढली होती. त्यांचा उल्हास उत्साह वाखणण्याजोगा होता. सकाळपासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडप तसेच घरोघरी गणरायाची गाणी आणि आरतीचे सूर अळवले जात असल्यामुळे सर्वत्र एक प्रकारचे मंगलमय वातावरण जाणवत होते.
आज सकाळपासून दुपारपर्यंत घरगुती गणेश मूर्तींची घरोघरी प्रतिष्ठापना झाल्यानंतर तरुणाई सार्वजनिक श्रीमूर्ती आणण्यासाठी घराबाहेर पडली. शहरातील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तींची दुपारपासून सुरू झालेली प्रतिष्ठापना आज रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार आहे. सार्वजनिक श्री गणेश मूर्ती प्रतिष्ठापणे प्रसंगी देखील मंडप परिसरात मोठे भक्तीपूर्ण उत्साही वातावरण पहावयास मिळत आहे.
जिल्हा प्रशासनातर्फे बाप्पाची प्रतिष्ठापना
जिल्हा प्रशासनाच्यावतीने आज गणेश चतुर्थी दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील पर्यावरण पूरक शाडू मातीची श्री गणेश मूर्ती आणण्यासाठी स्वतः जिल्हाधिकारी नितेश पाटील कित्तूर चन्नम्मा चौक श्री गणेश मंदिर येथील मूर्तिकाराकडे गेले होते. तेथे बाप्पाच्या मूर्तीला मांडीवर बसवून घेऊन आपल्या कारगाडीतून जिल्हाधिकारी पाटील आपल्या कार्यालयाकडे आले. त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयात गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांसह अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, पर्यावरण प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी जगदीश यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.