धार्मिक अल्पसंख्याकांना जशा सुविधा मिळतात, तशा सुविधा भाषिक अल्पसंख्यांक देखील मिळणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने सरकारने प्रयत्न केले पाहिजेत, जेणेकरून राज्याराज्यातील भाषिक अल्पसंख्यांकांचे हितरक्षण होईल, असे विचार गोव्याचे माजी केंद्रीय मंत्री ॲड. रमाकांत खलप यांनी व्यक्त केले.
रेल्वे ओव्हर ब्रिज नजीकच्या मराठा मंदिर येथे मराठा समाज सुधारणा मंडळ बेळगावतर्फे आयोजित मराठा समाजातील दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभाप्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे हे होते. त्याचप्रमाणे माजी प्राचार्य डॉ. एम. एन. जाधव, उद्योजक विजय कंग्राळकर, अशोक पाटील, दीपक किल्लेकर, मंडळाचे कार्याध्यक्ष शिवराज पाटील, सरचिटणीस जी. जी. कानडीकर, रेणुका मोहन सप्रे आदी उपस्थित होते.
प्रारंभी ॲड. रमाकांत खलप व इतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने समारंभाचे उद्घाटन करण्यात आले. छ. शिवाजी महाराज पुतळा पूजन विजय कंग्राळकर यांच्या हस्ते झाले. जी. जी. कानडीकर यांनी सर्वांचे स्वागत केल्यानंतर शिवराज पाटील यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांचे शाल पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.
आपण कायदा मंत्री केंद्र सरकारला देशभरातील र्मिक अल्पसंख्यांकाप्रमाणे भाषिक अल्पसंख्याकांना सुविधा द्याव्यात अशा सूचना केल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात पहिला देश एकसंघ करण्याचे कार्य केलं होतं लोककल्याणकारी राज्याची संकल्पना मांडली तोच तोच आधार पकडत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाच्या राज्यघटनेची निर्मिती केली. मराठा समाजाने इतरांना दुय्यम न समजता सर्वांना सोबत घेऊन स्वतःचा आणि देशाचा विकास साधावा असे आवाहन त्यांनी केले
मुलांबरोबरच मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढत आहे. तेंव्हा मुलांनी शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नये. मराठा समाजाने प्रत्येक क्षेत्रात प्रगती साधावयास हवी आणि एकमेकांना सोबत घेऊन समाजाचा विकास साधला पाहिजे, असेही स्पष्ट केले. देणगीदारांच्यावतीने डॉ. एम. एन. जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले अखेर प्रकाश मरगाळे यांच्या अध्यक्षीय भाषणानंतर पारितोषिक वितरण सोहळा पार पडला.
संजना नारायण घाडी, मधुरा विश्वनाथ वर्पे, प्रतीक्षा पांडुरंग माने, युती विशाल राऊत, प्रणिशा परशुराम चोपडे व व्यंकटेश योगेश डोंगरे यांच्यासह दहावीच्या एकूण 181 विद्यार्थी विद्यार्थिनींचा त्याचप्रमाणे स्वप्निल लक्ष्मण शहापूरकर, महेश मदन बामणे, मयुरी यशवंत शहापूरकर, निधी मारुती निलजकर, मृणाल रविशंकर आनंदाचे, रोशन किरण शिंदे व शैलेश महेश पावले यांच्यासह बारावीच्या 95 विद्यार्थी विद्यार्थिनींचा अशा एकूण 276 गुणवंत मुलामुलींचा यावेळी सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन सप्रे व के. एन. मजुकर यांनी केले. शेवटी संग्राम गोडसे यांनी सर्वांचे आभार मानले. समारंभास विद्यार्थी विद्यार्थिनी आणि पालकवर्गासह मराठा समाज सुधारणा मंडळाचे सर्व पदाधिकारी, सदस्य, निमंत्रित, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.