टाटा गुड्स कॅन्टरमधून बेकादेशीररित्या वाहतूक करण्यात येत असलेला अंदाजे 2 लाख 53 हजार 440 रुपये किमतीचा सुमारे 11 टन रेशनचा तांदूळ हारुगेरी पोलिसांनी जप्त केला असून याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.
वाहन चालक व मालक यमनप्पा भिमाप्पा माळ्यागोळ (वय 47, रा. संगणकेरी ता. मुडलगी) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नांव आहे. टाटा कंपनीच्या 1109 गुड्स कॅन्टर (क्र. के.ए. 49 /1155) मधून 384 पोत्यांमध्ये सुमारे 11 टन रेशनच्या तांदळाची बेकायदा वाहतूक होत असल्याची माहिती हारुगेरी पोलिसांना मिळताच त्यांनी सापळा रुचून उपरोक्त कारवाई केली.
सदर 2 लाख 53 हजार 440 रुपये किमतीचा तांदूळ गुर्लापूर क्रॉस मार्गे अथणीच्या दिशेने नेण्यात येत होता. हारूगेरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिडकल गावामध्ये पोलिसांनी कॅन्टर अडवून जप्तीची कारवाई केली. याप्रकरणी हारुगेरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.
‘बनशंकरी ऍग्रो’वर छापा; 55 पोती तांदूळ जप्त
लोकूर (ता. कागवाड) येथील बनशंकरी ऍग्रो प्रोसेस प्रा. लि. या कंपनीवर छापा टाकून कागवाड तालुका अन्न निरीक्षकांच्या नेतृत्वाखालील पथकाने बेकायदा साठा केलेला सुमारे 48 हजार 400 रुपये किमतीचा 55 पोती तांदूळ जप्त केला आहे.
बनशंकरी ऍग्रो प्रोसेस प्रा. लि. या कंपनीवर छाप्याची कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये कागवाड तालुका अन्न निरीक्षक सुनील कट्टी, अथणी तालुका अन्ननिरीक्षक मुजावर, लोकुर व्हिलेज अकाउंटंट के. पी. बडिगेर, एम. बी. पाटील, कागवाडचे पीएसआय आदींचा समावेश होता.
छाप्यामध्ये 48400 रुपये किमतीची प्रत्येकी 40 किलो वजनाची (एकूण 2200 किलो) 55 तांदळाची पोती जप्त करण्यात आली. याप्रकरणी गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.