बेळगावसह आसपासच्या ग्रामीण परिसरात तळ ठोकून असलेल्या चलाख युक्तीने निसटणाऱ्या बिबट्यावर पाळत ठेवणारे बेळगावचे वनखाते आता सदर बिबट्या हा ‘शहरी बिबटा’ असल्याच्या निष्कर्षाप्रत पोचले आहे. तब्बल 15 दिवस उलटून गेले तरी अद्याप सदर बिबट्या गुंगारा देत असल्यामुळे वन खातेही असहाय्य झाल्याचे दिसून येत आहे.
शहरी बिबटे हे सर्व प्रकारच्या भूप्रदेश आणि हवामानाशी जुळवून घेणारे असतात. जंगल, समशितोष्ण कटिबंध आणि उष्णकटिबंधाचे प्रदेश, माळरान, गवताचे कुरण, वाळवंट, खडकाळ आणि पर्वतीय प्रदेश या ठिकाणी त्यांचा अधिवास असतो. जंगलातील वाघांची वाढती संख्या त्यामुळे निर्माण झालेली भक्षांची कमतरता आणि सहजासहजी उपलब्ध होणारी कुत्री वगैरेेंसारखी भक्ष यामुळे अलीकडच्या काळात मानव वसाहती नजीकचे बिबट्यांचे वास्तव्य वाढले आहे.
वनखात्याच्या मते बिबट्यांचे जंगलाबाहेरही वास्तव्य असते. मात्र छपवाछपवीमुळे ते सहसा दृष्टीस पडत नाहीत. मानव वसाहत आणि शेतीच्या ठिकाणी बिबटे आढळून येतातच. त्यामुळे यड्डुरवाडी, सिंदगी, धर्मट्टी आणि बाकनूर या परिसरात अलीकडे बिबट्याचे दर्शन झाले यात नवल कांही नाही. सदर ठिकाणी बिबट्यांचे वास्तव्य असतेच फक्त मनुष्याच्या नजरेत ते येत नाहीत.
मांजर प्रजातीमध्ये बिबट्याचा आहार हा सर्वात व्यापक मानला जातो. त्यांच्या आहारात पशु -पक्षी, छोटे सस्तन प्राणी, माकडं, किटक आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचा समावेश असतो. बेळगाव परिसरात दाखल झालेल्या शहरी बिबट्याला गोल्फ कोर्स परिसरात मोर, ससे, मुंगूस, कुत्री, डुकरं आदींस्वरूपात मोठ्या प्रमाणात भक्ष उपलब्ध झाल्यामुळेच त्याने या ठिकाणी ठाण मांडले आहे.
वनखात्याने रेस कोर्स परिसरात प्रारंभी 22 ट्रॅप कॅमेरे बसविले होते. या कॅमेरापैकी एका कॅमेऱ्यात गेल्या 8 ऑगस्ट रोजी बिबट्याची छबी कैद झाली होती. परिणामी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी या परिसरात सापळे लावण्यात आले. मात्र कांही दिवस हा बिबट्या गायब होता. दरम्यान फॉरेस्ट खात्याकडे विविध भागात बिबट्या दृष्टीस पडल्याची माहिती दिली जात होती. सदर माहिती मिळताच वनाधिकारी गिरीश एस. बी. आणि भीमगडचे आरएफओ राकेश यांच्या नेतृत्वाखालील पथके संबंधित ठिकाणी जाऊन पावलांच्या ठशांचा तपास करून बिबट्याच्या अस्तित्वाची शहानिशा करत होते.
याच कालावधीत गेल्या 14 ऑगस्ट रविवारी अक्षय बासरकर यांना कार गाडीतून कॅम्प येथून हनुमाननगरकडे जाताना रात्री 2:15 वाजता गोल्फ कोर्स मेन गेटच्या ठिकाणी बिबट्या दृष्टीस पडला. वन खात्याचे अधिकारी आरएफओ राकेश यांना बिबट्याच्या पावलाच्या एक ठसा आढळून आला. याच वेळी हिंडलगा येथे बिबट्या आढळल्याची माहिती मिळताच वनाधिकारी गिरीश एस. बी. यांनी त्या ठिकाणी धाव घेतली. गोल्फ कोर्स मैदान परिसरातील मोठ्या प्रमाणात असलेला दाट गवताळ प्रदेश, बांबूची झाडे आणि सांडपाण्याची पाईपलाईन या गोष्टी बिबट्याला लपण्यासाठी उपयुक्त ठरत आहेत.
जाधवनगरनजीक बिबट्या आढळून आल्याच्या घटनेला आता 17 दिवस उलटले आहेत. यादरम्यान त्याने शहर आणि परिसरातील कोणत्याही मनुष्यावर हल्ला केलेला नाही. यावरून त्या बिबट्याने कोणत्याही मनुष्याला इजा न करता बेळगाव शहराशी जुळवून घेतले आहे. मनुष्याच्या अस्तित्वाशी त्याने जुळवून घेतले असून त्याला आपल्यामध्ये सहअस्तित्व हवे आहे.
बेळगावच्या शहरी प्रदेशात तो खूप आरामात असून कोणत्याही मनुष्याला इजा पोहोचवण्याचा त्याचा हेतू नाही असे जाणवते. तेंव्हा जर बिबट्यासारखा हिस्त्र जंगली प्राणी मनुष्याशी जुळवून घेत असेल तर आपण मनुष्यांनी देखील निश्चितपणे वन्यजीवांचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे मत जाणकार पशुप्रेमींमध्ये व्यक्त होत आहे.