शहरातील गोल्फ मैदान जंगल परिसरात तळ ठोकून असलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी दोन प्रशिक्षित हत्ती तसेच तज्ञ लोकांचे एक विशेष पथक हिंस्त्र वन्य प्राण्यांना पकडण्यासाठीच्या विशिष्ट प्रकारच्या जाळ्यांच्या साठ्यासह बेळगाव दाखल झाले आहे. या पद्धतीने जय्यत तयारी करण्यात आली असून बिबट्यासाठी शोध मोहीम सुरू झाली आहे.
बेळगाव गोल्फ मैदान जंगल परिसरात दडून बसलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी सर्वती सिद्धता करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिमोगा येथील अर्जुन आणि आलिया नावाच्या दोन प्रशिक्षित हत्तींसह मंगळवारी रात्री वन प्राण्यांना पकडणाऱ्या तज्ञांसह आठ जणांचे विशेष पथक काल मंगळवारी रात्री बेळगावात दाखल झाले आहे. त्यांनी आज बुधवारी सकाळपासून वनखात्याच्या मदतीने शोध मोहिमेला प्रारंभ केला आहे.
हत्तींच्या बरोबरीने बिबट्या पकडण्यासाठी गोल्फ मैदानाच्या ठिकाणी दाखल झालेल्या तज्ञ लोकांच्या पथकाला वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी आवश्यक मार्गदर्शन केले आहे.
आमदार अनिल बेनके, सीसीएफ मंजुनाथ चव्हाण आदिंसह वनखात्याचे अन्य वरिष्ठ अधिकारी बिबट्याला पकडण्याच्या मोहिमेवर जातीने लक्ष ठेवून आहेत. बिबट्याला सापळ्यात अडकविण्यासाठी हुक्केरी येथून टाटा एस वाहन भरून मजबूत जाळ्यांचा साठा मागविण्यात आला आहे. हत्तीवर स्वार तज्ञ शार्प शूटरकडून बंदुकीद्वारे गुंगीचे इंजेक्शन झाडून बिबट्याला बेशुद्ध करण्याद्वारे पकडले जाणार आहे.
या खेरीज बिबट्याने शार्प शूटरच्या तावडीतून निसटून जाण्याचा प्रयत्न केल्यास नियोजनबद्धरीत्या त्याला जाळ्यात पकडले जाणार आहे. ही जाळी पकडण्यासाठी तज्ञ लोकांबरोबरच ग्रामीण भागातील धाडसी मंडळींची मदत घेतली जात आहे. बिबट्याचे ठाव ठिकाण शोधण्यासाठी यापूर्वीच श्वान पथकांना पाचारण करण्यात आले आहे. त्याबरोबरच बेंगलोर येथून हायटेक ड्रोन कॅमेरेही आणण्यात आले असले तरी त्यासाठी लष्कराची परवानगी घ्यावी लागणार आहे.
एकंदर या पद्धतीने त्या चालाख बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन खात्याने कंबर कसली असून सर्व ती सिद्धता केली आहे. त्यामुळे आता तरी त्या बिबट्याचा शोध लागणार का? तो पकडला जाणार का? हे पहावे लागणार आहे.
हत्तीच्या मदतीद्वारे बिबट्याला पकडण्यासाठी ची मोहीम रेस कोर्स वर सुरू pic.twitter.com/fRlfJX6W2c
— Belgaumlive (@belgaumlive) August 24, 2022