बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील निधन पावलेल्या प्रथम दर्जा सहाय्यकावर अवलंबून असलेल्या त्याच्या भावाला अनुकंपा तत्वावर अवघ्या 24 तासात थेट सरकारी सेवेत रुजू करण्याचा आदेश देण्याद्वारे बेळगाव जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी माणुसकीचे दर्शन घडविले आहे.
बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रथम दर्जा सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या सचिन महादेव बादुले यांचे गेल्या 22 ऑगस्ट रोजी आजारपणामुळे निधन झाले. आपल्या भावाचे कामावर असताना निधन झाले असल्यामुळे कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी आपल्याला अनुकंपा तत्त्वावर सरकारी नोकरीत सामावून घेण्यात यावे, अशा आशयाचा अर्ज बसवराज महादेव बादुले यांनी केला होता.
सदर अर्जाची पडताळणी करून जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी मयत सचिन बादुले यांच्यावर अवलंबून असलेला त्यांचा भाऊ बसवराज याला केवळ 24 तासात ग्रुप ‘सी’ दर्जाच्या पदावर थेट नियुक्ती केली आहे.
बी. ए. पदवीधर असणाऱ्या बसवराज महादेव बादुले याची प्रथम दर्जा सहाय्यक पदी थेट नियुक्ती करण्याद्वारे त्याला चिक्कोडी तहसीलदार कार्यालयातील रिक्त असलेल्या प्रथम दर्जा सहाय्यक पदावर रुजू करून घेण्याचा आदेश बजावला आहे आहे.
या पद्धतीने कार्यालयातील एखाद्या कर्मचार्याचे अकाली निधन झालेल्याच्या कुटुंबातील व्यक्तीला अनुकंपा तत्वावर थेट सरकारी कामात रुजू करून घेण्याद्वारे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी माणुसकीचे दर्शन घडविले आहे.