बेळगाव शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने पुढे जात असल्याचा आभास निर्माण झाला आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बेळगावची झालेली निवड आणि संपूर्ण शहरात विविध ठिकाणी रस्ता रुंदीकरणासह हाती घेतलेली विविध विकासकामे! यामुळे नागरिकांना फायदा कमी आणि नुकसान अधिक झेलावे लागले आहे.
स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहराचे विद्रुपीकरण करण्यात येत असल्याचा आरोप अनेकवेळा नागरिकांकडून झाला आहे. तो आजही होत आहे. शहरातील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रस्ते मोठे झाले परंतु अनेक रस्ते शास्त्रीय पद्धतीने बांधण्यात आली नसल्याची तक्रार नागरिक कायम करत येत असून याचा अनुभव गेल्या कित्येक महिन्यांपासून बेळगावकर घेत आहेत.
शहरात विकासकामे राबविण्यात आली यादरम्यान अनेक रस्त्यांचे रुंदीकरण झाले. मात्र या रस्त्यांवर गतिरोधकांची व्यवस्था न करण्यात आल्याने अनेक वाहनचालक स्पर्धेत वाहन चालविल्याप्रमाणे सुसाट वेगात वाहने चालवू लागले. परिणामी अपघातांच्या संख्येत मोठी वाढ होऊ लागली आणि शहराच्या वाहतूक शिस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला. वारंवार रहदारी विभागाशी संपर्क साधून, आवाहने करून याकडे दुर्लक्ष करण्यात आले. अनेक ठिकाणी अर्धवट स्थितीत असलेल्या कामकाजांमुळे कित्येकांना आपले प्राण गमावण्याची वेळ आली. गेल्या आठवड्यात लागोपाठ २ ठिकाणी झालेल्या अपघातात दोन विद्यार्थ्यांचा नाहक बळी गेला. आणि या घटनांनंतर प्रशासन, नागरिक खडबडून जागे झाले. अनेक ठिकाणी तातडीने गतिरोधक बसविण्याची मोहीम हाती घेण्यात आली. अवजड वाहनांना प्रवेश बंदी झाली. मात्र लागलीच काल महात्मा फुले रोडवर येथे बेफाम येणाऱ्या कारने दुचाकीवर येऊन कार आदळली. यात सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी हा अपघात केवळ दैव बलवत्तर म्हणून थोडक्यात निभावला..
कॅम्प पोलीस लाईन ते बीएसएनएल कार्यालयापर्यंतच्या रस्त्याचीही काहीशी अशीच अवस्था झाली असून कॅंटोन्मेंट व्याप्तीत येणाऱ्या केवळ २०० मीटर रस्त्याचे रुंदीकरण न करण्यात आल्याने या रस्त्यावर अनेकवेळा अपघात होण्याचे प्रकार वाढले आहेत. कॅंटोन्मेंट अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, असहकार्य, स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, इच्छाशक्तीचा अभाव यामुळे या रस्त्याची हि दुर्दशा आहे.
आसपासच्या परिसरातील रस्ता मात्र चौपदरीकरण करण्यात आला असून केवळ २०० मीटर रस्त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. या परिसरात अनेक शाळा आहेत. या शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना रस्ता पार करून पलीकडे जातानाही अनेक अडचणी येत आहेत. येथील रस्त्याचे रुंदीकरण किंवा अंडर ब्रिज किंवा ओव्हर ब्रिजची व्यवस्था करण्यात आल्यास अपघातांपासून वाचता येईल.
रिंगरोडसंदर्भातील अडचणी दूर करून रिंगरोडचे काम मार्गी लावण्यात अधिकारी तत्परता दाखवतात परंतु नागरिकांसाठी आवश्यक असणाऱ्या रस्त्यांसंदर्भात मात्र अधिकारी वेळकाढूपणाचे धोरण अवलंबत असून यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत.
कोट्यवधी रुपये खर्चून स्मार्ट सिटी अंतर्गत विकासकामे होऊ लागली आहेत. कोट्यवधी रुपयांचा निधी असूनही निकृष्ट दर्जाची कामे करण्यात आल्याच्या अनेक घटना निदर्शनात आल्या आहेत. स्मार्ट सिटी कामकाजात घोटाळा झाल्याचे आरोपही होत आहेत. मात्र या सर्व गोष्टींमध्ये जनता नाहक भरडली जात असून जनतेच्याच पैशाचं चुराडा होत असल्याचा प्रकार दिसून येत आहे. यावर वेळीच अंकुश ठेवून तातडीने शहरातील अनेक रस्त्यांच्या रहदारीचा आणि वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावणे अत्यंत गरजेचे आहे.