मलबार चॅरिटेबल ट्रस्ट, बेळगाव शाखेच्यावतीने महिला शिक्षणासाठी पुढाकार घेण्यात आला असून विद्यार्थीनींसाठी शिष्यवृत्ती जाहीर केली आहे.
१८४ विद्यार्थीनींसाठी प्रत्येकी ६००० ते ८००० रुपये असा एकूण ११२०००० रुपये निधी शिष्यवृत्ती साठी जाहीर करण्यात आला आहे. यासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आमदार अनिल बेनके यांची प्रमुख उपस्थिती होती.
सरकारी प्रथम श्रेणी महिला महाविद्यालय, बेळगाव, सोमूअंगडी महाविद्यालय के के कोप्पळ, प्रथम श्रेणी सरकारी महिला महाविद्यालय बैलहोंगल, प्रथम श्रेणी सरकारी महिला महाविद्यालय बिडी या महाविद्यालयातील विद्यार्थीनींसाठी हि शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. ६० टक्के श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनी या शिष्यवृत्तीसाठी पात्र असतील. एसएसएलसी नंतरच्या उच्च शिक्षणासाठी हि शिष्यवृत्ती दिली जाईल.
यावेळी आमदार अनिल बेनके यांनी मलबार चॅरिटेबल ट्रस्टच्या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन केले. पुढील आयुष्यात आपले ध्येय कशापद्धतीने पूर्ण करता येईल, यासंदर्भात विद्यार्थ्यांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.
मलबार स्टोअर हेड सवाड पीआय, असिस्टंट स्टोअर हेड विपीन टी के, दावणगेरे स्टोअर हेड बेझल जॉर्ज आणि असिस्टंट स्टोअर मॅनेजर सुरज अणवेकर आदींच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.