Friday, January 24, 2025

/

स्वातंत्र्य संग्रामातील बेळगावचे स्वातंत्र्य सैनिक!

 belgaum

‘स्वातंत्र्य मिळाले जयामुळे, त्या शूरवीरांना स्मरू आम्ही!
बलिदान प्राणाचे दिले जयांनी, त्या त्यागाला स्मरू आम्ही!
देशभक्तीची अविरत गंगा जनजनात ठासून वसो!
नाम तुझे विश्वात साऱ्या, नित्य नित्य हे उच्च वसो!’

ब्रिटिशांची जुलुमी सत्ता, अन्याय, अत्याचार या साऱ्या जोखडातून आपला भारत स्वतंत्र झाला. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून सुटण्यासाठी भारताला अनेकांच्या रक्ताची किंमत मोजावी लागली. देशभक्तीसाठी कित्येक शूरवीरांनी देशावर जीव ओवाळला आणि स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली. स्वातंत्र्यासाठी झटणारे, बलिदान देणारे लाखो शूरवीर देशासाठी काही करून दाखविण्याच्या जिद्दीने भारावलेले होते. ज्या स्वातंत्र्य संग्रामाची धुरा उच्चपदावर ज्यांनी सांभाळली त्यांचे म्होरके म्हणून अनेकांनी आपापल्या परीने स्वातंत्र्य संग्रामासाठी योगदान दिले. भारतातील अशा शूरवीर योध्यांचा संघर्ष अखेर यशस्वी झाला आणि भारताला स्वातंत्र्य मिळाले. परंतु या स्वातंत्र्य चळवळीतील अनेक शूरवीर पडद्यामागेच राहिले. याच स्वातंत्र्य चळवळीत वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षांपासून स्वतःला झोकून देणाऱ्या ‘बेळगावमधील स्वातंत्र्यसैनिकाची देशसेवा’ आणि देशसेवेदरम्यान त्यांना आलेले अनुभव.. यासंदर्भातील ‘बेळगाव लाईव्ह’चा विशेष रिपोर्ट…

बेळगावमधील ज्येष्ठ स्वातंत्र्य श्री. विठ्ठलराव याळगी. १९२६ साली टिळकवाडी येथे जन्मलेल्या विठ्ठलराव याळगी यांनी स्वातंत्र्य पूर्व काळापासून देशसेवेत स्वतःला झोकून दिले.

१९०५ साली बेळगावमध्ये झालेल्या पहिल्या सत्याग्रहात विठ्ठलराव याळगी यांचे काका, लोकमान्य टिळकांचे अनुयायी गोविंदराव याळगी यांनी सहभाग घेतला. या आंदोलनात सहभागी झाल्यामुळे त्यांना शिक्षा सुनावण्यात आली तसेच दंडही ठोठावण्यात आला. परंतु गोविंदराव याळगी यांनी देशसेवेचे हे व्रत न थांबवता अखंड सुरु ठेवावे, यासाठी लोकमान्य टिळकांनी सूचना दिल्या आणि दंडाची रक्कमही भरली.

९ ऑगस्ट १९४२ साली महात्मा गांधींनी ‘छोडो भारत’ आंदोलनाचा नारा दिला. वयाच्या १६ व्या वर्षी ‘छोडो भारत आंदोलनात’ बेळगावमधून त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. देशसेवेचे बाळकडू आपल्या कुटुंबाकडूनच मिळविलेल्या विठ्ठलराव याळगी यांना त्यांचे काका गोविंदराव याळगी यांचे मार्गदर्शन लाभले. ‘चले जाओ चळवळ’ पुकारल्याने महात्मा गांधी, पंडित नेहरू, मौलाना आझाद, सरदार पटेल यासह अनेक देशभक्तांच्या अटकेचे सत्र सुरु झाले. या दरम्यान विठ्ठलराव याळगी यांचे वडील कृष्णराव याळगी यांनाही ९ ऑगस्ट १९४२ साली अटक झाली. तुरुंगवास झाला.

यादरम्यान देशसेवेची ज्योत काहीशी मंदावल्यासारखी जाणवली. कोणाचेही मार्गदर्शन न मिळाल्याने कशापद्धतीने पुढील मार्ग आखायचा हे कळेनासे झाले. यादरम्यान विठ्ठलराव याळगी यांचे बंधू गजानन याळगी हे वैमानिक शिक्षण घेऊन १९४०-४१ च्या दरम्यान बेळगावात परतले. त्यांच्या नेतृत्वाखाली कधी उघडपणे तर कधी गुप्तपणे पुन्हा देशसेवेचा पुढील मार्ग आखण्यात आला. देशातून इंग्रजांना पिटाळून लावण्यासाठी बॅरिस्टर नाथ पै यांच्यसह अनेक देशभक्तांच्या समूहातून विठ्ठलराव याळगी यांनी अनेक क्लृप्त्या लढविल्या. १९४०-४१ च्या दरम्यान टिळकवाडी पहिले रेल्वे गेट येथून गुप्त कारवायांना प्रारंभ झाला. ठिकठिकाणी बॉम्ब उडवणे, रेल्वेच्या तारा तोंडाने, पोलीस स्थानके, पोस्ट ऑफिस यासह प्रत्येक सरकारी कार्यालयांवर हल्ला करून इंग्रजांच्या चळवळी मोडीत काढणे, अशा गोष्टी घडवून आणण्यात आल्या. यादरम्यान कोणाचेही प्राण घ्यायचे नाहीत हि गोष्ट मात्र त्यांनी कायम पाळली.

Vitthal yalgi
ज्येष्ठ बंधु कै.स्वातंत्र्यसैनिक गजानन याळगी यांच्या समवेत स्वातंत्र्य सैनिक विठ्ठल याळगी. १९४२ सालीचा क्षण..

१९४३ साली टिळकवाडी पोलीस स्टेशनवर हल्ला करण्याची योजना आखली. १५ ते १६ लोकांच्या समूहाने साधारण मार्च महिन्यात हल्ला केला. यावेळी पोलिसांना त्रास देत त्यांच्या बंदुका हस्तगत करून काँग्रेस विहिरीत टाकण्यात आल्या. चिडलेल्या पोलिसांनी चौकशीची चक्रे सुरु केली. यादरम्यान काही लोक त्यांच्या हाती लागले आणि याच लोकांच्या माध्यमातून हळूहळू प्रत्येकाची नावेही बाहेर आली. या साऱ्यांना अटक झाली. अटकेनंतर या साऱ्यांचे बेहाल झाले. पोलिसांनी मोठा छळ सुरु केला. जेवण न पुरविणे, बर्फाच्या लादीवर विवस्त्र झोपवणे, चपलांची मारहाण करणे.. अशा अनेक असंख्य वेदनादायक त्रासांची मालिका सुरु झाली. या वेदना सहन करूनही विठ्ठलराव याळगी आणि इतर देशभक्तांनी आपली देशभक्ती जागीच ठेवली.

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर विठ्ठलराव याळगी यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली. शाळा सुरु केली. स्वतःच्या शिक्षणाचा पुनःश्च हरिओम केला. रजपूत बंधू शाळेत प्राथमिक शिक्षण घेतलेल्या विठ्ठलराव याळगी यांनी हायस्कुल पर्यंतचे शिक्षण टिळकवाडी हायस्कुलमध्ये पूर्ण केले आहे. तर पुण्यात इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग डिप्लोमा पूर्ण केला आहे. शिक्षणादरम्यान वंदे मातरम म्हणून वर्गात जाण्याचा अट्टाहास देखील विठ्ठलराव याळगी यांना त्याकाळी महागात पडला आहे. त्यांच्या या अट्टाहासापायी त्यांना छडीचा मारही सहन करावा लागला आहे. विठ्ठलराव याळगी यांच्यात देशप्रेम इतके ओतप्रोत भरले आहे कि त्यांनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी गणपत गल्ली येथे ‘नवहिंद कॉलिंग’ नावाचे दुकानही सुरु केले. या दुकानाचे उद्घाटन देशभक्त गंगाधरराव देशपांडे यांच्याहस्ते झाले. रेडिओ दुरुस्तीसह अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंची दुरुस्ती करणाऱ्या बेळगावमधील या स्वातंत्र्यसैनिकात आजही तितकेच देशप्रेम भरले आहे.Vittal rao yalgi

स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पालकमंत्र्यांनी त्यांचा सत्कार केला. आपण स्वातंत्र्य चळवळीसाठी केलेल्या कार्याची दखल आज प्रशासनाने घेतली याचे आपल्याला समाधान असल्याचे स्वातंत्र्य सैनिक विठ्ठलराव याळगी सांगतात.

विठ्ठलराव याळगी यांच्या कुटुंबातील १६ सदस्य देशसेवेत होते. संपूर्ण कुटुंबातील इतक्या मोठ्या प्रमाणातील सदस्य देशसेवेत असणारे भारतातील हे एकमेव कुटुंब म्हणावे लागेल. या कुटुंबातील अनेक सदस्यांना स्वातंत्र्य चळवळीदरम्यान तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. स्वातंत्र्य चळवळीत स्वतःला झोकून देत, ब्रिटिशांच्या जुलुमांना सहन करत, त्यांच्या जुलुमांना न जुमानता देशसेवेचे व्रत अखंड जागृत ठेवत, स्वातंत्र्य चळवळीत योगदान देत देशप्रेम बाळगणाऱ्या विठ्ठलराव याळगी यांना ‘टीम बेळगाव लाईव्ह’ चा सलाम!

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.