उसाच्या शेतात काम करत असताना जमिनीवर पडलेली विद्युत तार बाजूला करताना तारेतील विद्युत प्रवाहाचा धक्का बसून दोघा शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सौंदत्ती (जि. बेळगाव) तालुक्यातील हिरूरी गावामध्ये घडली.
फकीराप्पा चंदरगी आणि महादेव मेत्री अशी विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी शेतकऱ्यांची नावे आहेत. हे दोघे आज उसाच्या मळ्यात काम करत असताना त्यांना पिकामध्ये एक तार पडल्याचे आढळून आले.
दोघे मिळून ती तार दूर करण्याच्या प्रयत्नात असताना तारेतील वीज प्रवाहाचा धक्का बसून दोघेही जागीच गतप्राण होण्याची दुर्घटना घडली. याबाबतची माहिती मिळताच सौंदत्ती पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
तसेच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हॉस्पिटलकडे धाडले, असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख संजीव पाटील यांनी दिली.