स्टिंग ऑपरेशन करणाऱ्या एका वृत्तवाहिनीच्या कॅमेरामनवर हावेरी येथे नुकताच हल्ला झाला. या हल्ल्याचा निषेध करत पत्रकारांवरील हल्ले रोखावेत, अशी मागणी बेळगाव जिल्हा श्रमिक पत्रकार संघातर्फे करण्यात आली आहे.
बेळगाव जिल्हा श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप कुरुंदवाडे यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीची निवेदन आज सोमवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. हावेरी येथे एका वृत्तवाहिनीकडून शेतकरी नेत्याचे स्टिंग ऑपरेशन केले जात होते.
त्यावेळी संबंधित वृत्तवाहिनीच्या कॅमेरामनवर हल्ला करण्यात आला. गैरकारभाराला आणि अन्यायाला वाचा फोडणाऱ्या पत्रकारावर या पद्धतीने होत असलेले हल्ले निषेधार्थ आहेत.
याची गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी तसेच पत्रकारांवरील हल्ले रोखण्यासाठी तात्काळ पावले उचलावीत, अशा आशयाची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनाचा स्वीकार करून जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. निवेदन सादर करतेवेळी राजू पाटील, विलास जोशी श्रीकांत कुबकडडी, कुंतीनाथ कलमनी, दीपक बुवा आदिसह बेळगाव जिल्हा समिती पत्रकार संघाचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.