टिळकवाडी आरपीडी क्रॉस येथील एका बाजूच्या तुंबलेल्या गटारीतील सांडपाणी पावसामुळे सध्या रस्त्यावरून वाहत असल्याने नागरिकांसह विशेष करून विद्यार्थी -विद्यार्थिनींना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या गटारी बाबत वारंवार तक्रारी करूनही बेळगाव महापालिका आणि स्मार्ट सिटीने केलेले दुर्लक्ष या मनस्तापाला जबाबदार असल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत असून बेळगाव स्मार्ट सिटी होणार तरी केंव्हा? असा सवाल केला जात आहे.
टिळकवाडी येथील खानापूर रोडवरील आरपीडी क्रॉस येथे एका बाजूची गटार गेल्या कित्येक वर्षापासून तुंबलेली आहे. तुंबणाऱ्या या गटारीमुळे अस्वच्छतेचे वातावरण निर्माण होऊन दुर्गंधी पसरण्याबरोबरच डास -माशांचा प्रादुर्भावही वाढत असतो. या गटारीतील सांडपाण्याचा निचरा केला जाऊन साफसफाई केली जावी यासाठी गेल्या कांही वर्षापासून स्थानिक व्यापारी आणि नागरिकांसह सेवाभावी संस्था प्रयत्नशील आहेत.
मध्यंतरी एका सेवाभावी संघटनेने सांडपाण्याचे तळे साचलेल्या या गटारीच्या ठिकाणी रंगबिरंगी फुगे लावून प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तरीही या भागाच्या नगरसेवक, आमदारांसह महापालिका आणि स्मार्ट सिटी लिमिटेडच्या अधिकाऱ्यांकडून तुंबणाऱ्या गटारीची समस्या निकालात काढण्याकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे.
लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणाचे परिणाम सध्या आरपीडी क्रॉस येथे कायम ये -जा असणाऱ्या नागरिकांना आणि वाहन चालकांना भोगावे लागत आहेत. पावसाचा जोर वाढला असल्यामुळे आरपीडी क्रॉस येथील या गटारीमधील सांडपाणी रस्त्यावर ओसंडून वाहत आहे. यामुळे विशेष करून या भागातील जीएसएस कॉलेज, आरपीडी कॉलेज, गोगटे कॉलेज आदी महाविद्यालयांच्या विद्यार्थी -विद्यार्थिनींना गटारीच्या घाण सांडपाण्यातून ये -जा करावी लागत आहे.
रस्त्यावरून सांडपाणी वाहत असल्यामुळे संपूर्ण आरपीडी क्रॉस चौकात सध्या अस्वच्छता पसरली आहे. सदर प्रकारामुळे नागरिकात तीव्र संताप व्यक्त होत असून वर्षानुवर्षे सांडपाणी तुंबून रस्त्यावर वाहणाऱ्या आरपीडी क्रॉस येथील त्या गटारीच्या बाबतीत युद्ध पातळीवर उपाययोजना केली जावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.