प्राणघातक तीक्ष्ण शस्त्राने वार करून एका युवकाचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना हुक्केरी तालुक्यातील हिडकल डॅम गावामध्ये उघडकीस आली आहे.
हिडकल डॅम (ता. हुक्केरी) गावामधील रहिवासी 32 वर्षीय परशुराम हलकर्णी याचा हल्लेखोरांनी तीक्ष्ण हत्यारांनी सपासप वार करून गावातील अंजनेय मंदिरानजीक खून केल्याचे उघडकीस आले आहे.
या प्रकारामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. खुनानंतर मंजुनाथ (वय 24) आणि केंपण्णा नेसरगी (वय 30) असे दोघेजण स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाले असून एक जण फरारी आहे.
खून झालेल्या परशुराम हा किराणी दुकानदार होता. पूर्ववैमनस्यातून त्याचा खून झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी यमकनमर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.