जवळपास गेल्या महिन्याभरापासून बेपत्ता असलेले बेळगावच्या कमांडो विंग मधील सुभेदार मेजर सुरजितसिंग एच (वय 47) हे अखेर काल शुक्रवारी पोलिसांच्या हाती लागले. कॅम्प पोलिसांनी बेळगाव रेल्वे स्थानकावर त्यांना ताब्यात घेऊन काल रात्री लष्करी अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले.
पंजाब मधील गुरुदासपूर जिल्ह्याचे रहिवासी असणारे सुभेदार मेजर सुरजीत सिंग बेळगाव कमांडो विंगमध्ये कमांडोना प्रशिक्षण देण्याचे काम करतात. गेल्या शनिवारी 11 जून पासून ते बेपत्ता झाले होते. यासंबंधी लष्करी अधिकाऱ्यांनी कॅम्प पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. सुरजित सिंग हे 11 जून रोजी सायंकाळी आपला नवा मोबाईल दुरुस्त करण्यासाठी शहरात आले होते.
धर्मवीर संभाजी चौक येथील वैशाली रेस्टॉरंट अँड बार या ठिकाणी आपली सायकल पार्क करताना सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये ते शेवटचे आढळून आले होते. त्यानंतर गुढरित्या बेपत्ता झालेल्या सुरजितसिंग यांना शोधण्यासाठी लष्करी अधिकारी व जवानांनी शहरातील गल्लीबोळ पिंजून काढले होते. मात्र तरीही त्यांचा कोणताही मागमूस लागला नव्हता.
अखेर सुरजित सिंग यांच्याबद्दल माहिती देणाऱ्यास 50 हजार रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा देखील कमांडो विंगने केली होती. याखेरीज बेळगाव पोलीस प्रशासनाकडून पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष तपास पथक देखील तैनात करण्यात आले होते. मात्र तरी देखील काल शुक्रवार सायंकाळपर्यंत सुभेदार मेजर सुरजित सिंग यांचा पत्ता लागला नव्हता.
कॅम्प पोलिसांनी केली चौकशी
अखेर तब्बल 28 दिवसानंतर काल सायंकाळी सुरजितसिंग बेळगाव रेल्वे स्थानकावर असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाकडून मिळताच कॅम्पचे पोलीस निरीक्षक प्रभाकर धर्मट्टी व त्यांच्या सहकाऱ्यांनी रेल्वे स्थानकावर जाऊन त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर रात्री त्यांना लष्करी अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार सुभेदार मेजर सुरजित सिंग हे हुबळीहून कोल्हापूरला निघाले होते.
शुक्रवारी दुपारी रेल्वे स्थानक येथे सापडले पोलीस व कमांडो विभागाने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांची मनस्थिती बिघडली असल्याचे मानसिक झाले असल्याचे दिसून आले त्यांना आपण काय केलं व कुठे गेलो हे देखील आठवत नसण्याचे चौकशीत आढळून आले आहे.