सध्या बेळगाव जिल्ह्यात होणारा मुसळधार पाऊस हा बहुतांशी लोकांना त्रासदायक ठरत असला तरी जिल्ह्यात तूर्तास तरी पुराचा धोका नाही. पूर परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत, अशी माहिती बेळगावचे पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी दिली.
बेळगाव जिल्ह्यातील पूर्वपरिस्थिती बाबत प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना मंत्री कारजोळ म्हणाले की, कोयना धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. दोन दिवसांपूर्वी आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार तेथे 30 टीएमसीपेक्षा जास्त पाणी साठलेले नाही.
कोयना जलाशयाची एकूण पाणीसाठा क्षमता 105 टीएमसी आहे. धरण पूर्ण भरेपर्यंत ते पाणी बाहेर पडू दिले जात नाही. वारणा येथे 34 टीएमसी क्षमतेचे दुसरे धरण आहे तेथेही अजून 25 टीएमसी पाणीसाठा झालेला नाही. दूधगंगा नदीवर असलेल्या 25 टीएमसी क्षमतेच्या धरणामध्ये केवळ 11 टीएमसी पाणीसाठा संग्रहित झाला आहे.
राजापूर बॅरेजपर्यंत आपल्याकडे सात बॅरेजेस आणि बंधारे आहेत. आपल्या सीमाभागात जेवढे पाणी येते ते पाणी 59 टीएमसी इतकेही नाही. त्यामुळे सध्या तरी जिल्ह्यात पुराची भीती नाही. वाढत्या पावसामुळे स्थानिक लोकांचे हाल होत असले तरी त्यांचे त्रास दूर करून दिलासा देण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना मी अधिकाऱ्यांना यापूर्वीच केल्या आहेत असे सांगून आमचे अधिकारी संपूर्ण जिल्ह्यात सतर्कतेने कार्यरत आहेत, असे मंत्री कारजोळ यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांचे अध्यक्षतेखाली गेल्या 8 जुलै रोजी पूर नियंत्रणाबाबत बैठक झाली. बैठकीत राज्यातील पूर परिस्थितीची माहिती घेण्यात आली व त्याबाबतच्या सूचना सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. राज्यात अतिवृष्टी आणि पावसाअभावी कोणतीही समस्या नसून सरकारने याबाबत योग्य ती उपाययोजना केली आहे. पूरनियंत्रणाबाबत वेळोवेळी बैठका होऊन योग्य ते निर्णय घेण्यात आले आहेत. या संदर्भात बेळगाव आणि बागलकोटच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी जिल्ह्यात 386 निवारा केंद्र, 266 पशु बचाव केंद्र आणि 36 बोटींची व्यवस्था करण्यात आली आहे. आमच्याकडे एनडीआरएफच्या 22 तुकड्या आणि सुमारे 200 स्वयंसेवक आहेत. बेळगाव जिल्ह्यातील सुमारे 61 गावे पूर्णपणे पाण्याखाली तर 166 गावे अंशतः पूरग्रस्त होण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या पीडी खात्यात 28 कोटी रुपये आहेत. या पद्धतीने वेळोवेळी सर्व व्यवस्था करण्यात येत आहे. पूर नियंत्रणाच्या सर्व उपाययोजना यापूर्वीच करण्यात आल्या आहेत. बागलकोटमध्ये देखील आमच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वीच बैठका घेऊन कोणतीही अडचण येऊ नये यासाठी खबरदारीची पावले उचलली आहेत. पूरग्रस्तांना तातडीने मदत पोहोचविण्याची सूचना करण्यात आली आहे, असेही जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी स्पष्ट केले