नादुरुस्त दिव्यांमुळे गेल्या काही दिवसापासून अंधारात असलेली सदाशिवनगर बेंगलोर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती आज सोमवारी बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांच्या पुढाकाराने पुन्हा उजळून निघाल्यामुळे स्थानिक मराठा समाजा मध्ये समाधान व्यक्त होत आहे.
सदाशिवनगर बेंगलोर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोरील दिवे गेल्या काही दिवसापासून बंद अवस्थेत होते. त्यामुळे सायंकाळनंतर मूर्ती अंधारात बुडून जात होती. ही बाब काल रविवारी बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांच्या निदर्शनास आली.
आमदार बेनके सध्या कांही शासकीय कामानिमित्त बेंगलोर दौऱ्यावर आहेत. सदाशिवनगर येथील शिवरायांच्या मूर्ती समोरील दिवे बंद असल्याची बाब आमदार बेनके यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ बेंगलोर महापालिका आणि बेंगलोर प्रशासनाशी संपर्क साधून छ. शिवाजी महाराजांच्या मूर्ती समोरचे लाईट लावून घेतले.
बेंगलोर दौऱ्यावर असताना सदाशिवनगर येथून जात असता तेथील अश्वारूढ छ. शिवाजी महाराजांच्या मूर्ती समोरील बंदावस्थेतील दिव्यांची बाब आमदार बेनके निदर्शनास आली. तेंव्हा त्यांनी नेहमीप्रमाणे धडाडीने पुढाकार घेऊन युद्ध पातळीवर शिवरायांच्या मूर्ती समोरील दिवे पूर्ववत उजळवल्यामुळे स्थानिक मराठा समाज आणि मराठी भाषिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
बेंगलोर येथे मराठा विकास प्राधिकरणाच्या कार्यालयाचे उद्घाटन आणि बोधचिन्हाचे अनावरण उद्या मंगळवारी होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा समारंभ होणार आहे. आमदार ॲड. अनिल बेनके या समारंभाला हजेरी लावणार आहेत.