दुहेरी भूमिका न घेता सर्वत्र कन्नड भाषेची बेधडक अंमलबजावणी करण्यात यावी. त्या अनुषंगाने येत्या दोन दिवसात उचगाव येथील मराठीतील स्वागत कमान कन्नड भाषेत लिहिण्यात यावी अशी सूचना कन्नड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष टी. एस. नागभरणा यांनी केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज सोमवारी सकाळी आयोजित बैठकीमध्ये ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकाऱ्यांसह कन्नड विकास प्राधिकरणाचे सदस्य आणि संबंधित विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत प्राधिकरणाचे अध्यक्ष नागभरणा यांनी बेळगावसह सीमा भागात कन्नड भाषेची बेधडक कठोर अंमलबजावणी बाबत विविध सूचना करण्याबरोबरच उचगाव येथील स्वागत कमानी वरील मराठी मजकूर काढून येत्या दोन दिवसात तो कन्नड भाषेत लिहिण्याची सूचना केली.
जिल्हा प्रशासनाचे विविध खात्याचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.कन्नडसाठी झगडणाऱ्या कानडी संघटनांच्या कार्यकर्यांवरील गुन्हे मागे घ्या अशाही सूचना नागभरण यांनी केल्या आहेत.
दरम्यान, भाषिक अल्पसंख्यांक कायद्यानुसार आपल्याला सरकारी कामकाजात मराठीचा अंतर्भाव केला जावा सरकारी परिपत्रके निवडणूक संबंधी कागदपत्रे मराठीत मिळावीत अशी बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिकांची मागणी आहे. मराठीच्या अंमलबजावणी बाबतीत न्यायालयाने देखील मराठी भाषिकांच्या बाजूने निर्णय दिला आहे त्याचप्रमाणे अलीकडे पंतप्रधान आणि राष्ट्रपती कार्यालयाकडून सरकारी परिपत्रके कागदपत्रे मराठीत मिळावी या मागणीची दखल घेण्यात आली असून तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्याची सूचना राज्याच्या मुख्य सचिवांना करण्यात आली आहे.
मुख्य सचिव आणि त्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना सुचित केले आहे. या पार्श्वभूमीवर कन्नड विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षांनी सरकारी कार्यालयांसह सर्व ठिकाणी कन्नड भाषेची अंमलबजावणी करण्याची सूचना केल्यामुळे सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे या निर्णयाचा मराठी भाषिकांकडून तीव्र निषेध केला जात आहे.