बळ्ळारी नाल्याच्या पुरामुळे शेती पाण्याखाली जाऊन कोट्यावधीची नुकसान झाले आहे. यासंदर्भात कृषी अधिकाऱ्यांनी आज शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी पाहणी दौरा करून नुकसानीचा अंदाज घेतला. यावेळी स्थानिक नगरसेवक देखील त्यांच्या समवेत होते.
दरवर्षीप्रमाणे यावेळी बळ्ळारी नाल्याला पुर येऊन परिसरातील शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आहेत. यामुळे यंदा देखील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतीच्या नुकसानीचा अहवाल तयार करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी काल शुक्रवारी वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांनी पूरग्रस्त शेत जमिनीचा पाहणी दौरा केला होता.
मात्र एका दिवसात सर्व शेतजमिनींची पाहणी करून माहिती घेणे शक्य नसल्यामुळे कृषी अधिकाऱ्यांनी आज पुन्हा पाहणी दौऱ्याचे आयोजन केले होते.
सदर पाहणी दौऱ्यात कृषी अधिकारी अरविंद राठोड, ग्राम सहाय्यक राजू पोनजी, नगरसेवक बसवराज मोदगेकर, महावीर पाटील, बसवंत संभाळद, किरण बेडका व आनंद पाटील यांचा सहभाग होता. या सर्वांनी बळ्ळारी नाल्याच्या पुरामुळे क्षतिग्रस्त झालेल्या बसवणं कुडची व अलारवाड येथील शेत जमिनीची पाहणी केली.
बसवणं कुडची बळळारी वाढलेल्या जलपर्णीमुळे आणि टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे येळ्ळूर हलगा आणि शहरातून येणाऱ्या पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत नसल्याचे समोर आले आहे.बेळगाव live ने देखील नाल्यावर जात ग्राउंड रिपोर्टिंग करत त्याचा आढावा घेतला होता याची दखल स्थानिक नगरसेवक आणि अधिकाऱ्यांनी घेत या नाल्याची पहाणी केली आहे.
केवळ पहाणी करून समस्या मिटणार नसून यासाठी सामूहिक प्रयत्न होणे गरजेचे आहे.एकीकडे अधिकाऱ्यांनी उन्हाळ्यात नाला खुदाई केली पाहिजेत तर सध्या पाणी निचरा कसे होईल यावर उपाय योजना केल्या पाहिजेत तर दुसरीकडे जनतेने कोणताही कचरा नाल्यात फेकणे बंद केले पाहिजे तरच सगळं शक्य आहे.